ठाणे जिल्ह्यातील बदलापुरची घटना ताजी असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वर्दडी गावातील जिल्हा परिषदेच्या ५६ वर्षाच्या शिक्षकाने वर्गातील मुलींसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात काल २३ ऑगस्टला शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम शिक्षक २ वर्षानंतर सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्याआधीच त्यांच्यावर विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
वर्दडी (बु) येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या ठिकाणी इयत्ता १ ते ८ वर्ग आहेत. आरोपी शिक्षकाकडे गेल्यावर्षी इयत्ता ३ ची जबाबदारी होती. यावर्षी वर्ग ४ था होता. इयत्ता चौथीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत. सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले. त्याची वाईट कृती थांबत नव्हती. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रदिप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्यापर्यंत गेले. त्यानंतर या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनागव राजा पोलीस स्टेशन गाठले. किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा मुलीची भेट घेतली. तिच्यासोबत शाळा गाठली. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षकांविरोधात तालुक्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अप क 183/2024 कलम 64(2) (f) (1) (m),65(2), 76(1) (1)B.N. 5. सह कलम 4, 6,8,10,12 का.से.अ.प्र.अधि. 2012, सहजम 3(1) (w) (1) (1) (2) (v).3 (1) (R) (s) (w), गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम आणि ठाणेदार विनोद नरवाडे करत आहे.