महाराष्ट्र

Lok Sabha Election : शेतकऱ्यांचा विषय संपविणाऱ्यांना धडा शिकवा

Bachchu Kadu : चुरणी येथे दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Amravati constituency : जातीपातीच्या व झेंड्याच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा विषय संपवला गेला आहे. शेतकरी, शेतमजुरांनी आता सजग होऊन शेतकऱ्यांचा विषय संपविणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ मेळघाट परिसरातील व चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या चुरनी येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार राजकुमार पटेल,उमेदवार दिनेश बुब, रोहित पटेल, बल्लू जवंजाळ आदी उपस्थित होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग मतदारांच्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी दिनेश बुब सारखा सच्चा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित समस्या सोडवायच्या आहेत. त्यासाठी सुज्ञ शेतकरी, शेतमजुरांनी झेंडा आणि जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता दिनेश बुब सारख्या कार्यकर्त्याला लोकसभेत पोहोचवावे. त्यासाठी त्यांच्या शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबण्याचे आवाहन देखील आमदार बच्चू कडू यांनी केले. मेळघाट सारख्या निसर्ग संपन्न परिसराला कुपोषणासारखा कलंक लागला आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी समस्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. वर्षातून एकवेळा मेळघाटात केवळ पर्यटनासाठी येणारा लोकप्रतिनिधी केवळ नाचण्या बागडण्यात खुश असतो. त्याला मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांबाबत काही देणे घेणे नसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. विद्यमान खासदाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. केवळ झेंड्याच्या आणि जातीपातीच राजकारण करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या राजकारण्यांना या निवडणुकीत धडा शिकवित दिनेश बुब सारख्या हक्काच्या माणसाला एक वेळ संधी द्या असे बच्चू कडू म्हणाले.

आमदार राजकुमार पटेल यांनी देखील मेळघाटातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. दिनेश बुब सारखा कार्यकर्ता लोकसभेच्या सभागृहात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी मेळघाटातील मतदारांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करुन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. प्रहार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मेळघाटात आमदार बच्चू कडू व आमदार राजकुमार पटेल यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलेला दिसतो. सध्या मेळघाटात शिट्टीचा आवाज गुंजत असल्याचे दिसून येत आहे. चुरणी येथील प्रचार सभेला पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!