Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही राज्य सरकारने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. 1 जुलै पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. महिलांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली आहे. पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. अमरावती पाठोपाठ अकोल्यातही तलाठ्यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींकडूनच पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे.
योजना 1 जुलैपासून सुरू
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिलांसाठी एक महत्वाची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना 1 जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र असून यासाठी 1 जुलैपासून तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अकोला शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. अकोल्यातील मोठी उमरी भागात या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी हे चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचे समोर आले. महिलांकडून पैसे उकळतानाची त्याची चित्रफित आणि छायाचित्र प्रसारीत झाल्याने खळबळ उडाली.
महत्वाचे कागदपत्रे
लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला यासारखे महत्वाचे कागदपत्रे लागत आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यासाठी अकोला शहरातील मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यादरम्यान तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे एका व्हायरल व्हिडीओतून समोर आलं आहे.
Maharashtra Budget : ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ
‘द लोकहीत’ हे या व्हिडीओची पुष्टी करीत नाही. तलाठी कार्यालयातील हा प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे. त्यामुळे अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर येतो आहे. त्यामुळे अनेक भागात लाडकी बहिण योजनेखाली महिलांची लूट सुरू असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे.
जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पूर्वी या योजनेची तारीख ही 15 जुलैपर्यंत होती. मात्र आता सरकारने ही तारीख वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. यातील अटीशर्तीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
नियम शिथिल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचे सांगितले. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे, त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करताना महिलांकडून पैसे उकळण्याचा प्रकार झाल्यानंतर आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहावे लागणारे आहे.