Gondia : काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी कृषी बियाणांत होत असलेल्या भेसळखोरीसाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. सर्व तालुक्यांतील कृषी केंद्रांची तपासणी करून भेसळयुक्त बियाणे, खते विकणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करावी. तालुकास्तरावर भरारी पथकाच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवावे, असे खडे बोले त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुनावले.
तालुका कृषी अधिकारी आमगाव व सालेकसाच्यावतीने खरीप हंगाम पूर्व आढावा सभेचे संयुक्त आयोजन तहसील कार्यालय आमगाव येथे करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कोरोटे हे होते. तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्याचे खरीप हंगाम पूर्व नियोजनाचे सादरीकरण केले. यानंतर आमदार कोरोटे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.
सहसराम कोरोटे यांनी आयोजित बैठकीत बियाणांचा मुद्दा प्रकर्षाने रेटून धरला. जिल्ह्यात येत असलेल्या बोगस बियाण्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाचा पाढा त्यांनी बैठकित वाचून दाखवला. दरम्यान अशा बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनात केल्या. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणेगिरीबाबत हलगर्जीपणा आपण सहन करणार नाही, असा दमदेखील आमदार कोरोटे यांनी दिला आहे.
दरम्यान खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढून लाभ मिळाले पाहिजे. अवकाळी पावसामुळे होणाऱ्या शेती नुकसानीचे विहित वेळेत सर्वेक्षण होऊन लाभ देण्यात यावा. हंगामापूर्वी माती परीक्षणाची कामे पूर्ण करा. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीशाळा प्रात्यक्षिके घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना बियाणे खताचा तुटवडा भासू नये. शेतकऱ्याच्या बांधावर होणाऱ्या शेती शाळेच्या माध्यमातून लागवड खर्च कमी करून पर्यावरणाला पूरक आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देणारी योजना व त्याबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. अशा सूचना आमदार कोरोटे यांनी केल्या.
काय म्हणाले कृषी अधिकारी?
यावेळी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्वच योजना कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, अशी कृषी विभागाची यंत्रणा ग्रामीण स्तरावर काम करत आहे. कृषी कर्मचाऱ्यांची पदे 50 टक्केपेक्षा कमी आहेत. कामाचा भार असूनही यंत्रणा विविध शेतकरी मार्गदर्शन सभा गावोगावी सुरू आहेत. त्यासाठी अधिक वेगाने योजना राबवा, अशा सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिल्या. यावर्षीचे कृषी उत्पादन वाढीचे नियोजित धोरण विषद करून योग्य वेळी दिलेले उद्दिष्ट हमखास साध्य करणार असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.