Shiv Sena : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरून तीन दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (ता. 5) दानवे हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.
राज्य विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा पाचवा दिवस गाजला तो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना केलेल्या शिवीगाळीमुळे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात आणलेल्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली. त्यानंतर हाच वाद आंदोलनावर येऊन पोहचला.
उपसभापतींकडून समज
दुसऱ्या दिवशी आमदार लाड यांनी सत्ताधाऱ्यांसह पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. दानवे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Grohe) यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केले.
अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे. ही कसली संस्कृती आहे. त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे. अशा वक्तव्यमुळे चुकीचा पायंडा पडेल, असं डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात वापरलेल्या आपल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थनही केले. मी समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी शिवसैनिक आहे. त्यामुळे त्याच बाण्याने उत्तर दिले, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्यावतीने देखील दानवे त्यांची बाजू घेत त्यांचे समर्थन करण्यात आले होते. अंबादास दानवे यांना 2 जुलै रोजी पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे दानवे यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता नव्हते.
अशात अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे. पाच दिवसाच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवसांचा केल्याने शुक्रवारपासून अंबादास दानवे हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्यामुळे दानवे सहभागी झाल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.