Political war : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला. दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 2 जुलै रोजी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनाचा पाचवा दिवस गाजला तो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळ केल्यामुळे. 1 जुलै रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि सभागृहाच्या परंपरेच्या चिंधड्या उडाल्या.
कामकाज तहकूब
आपल्या जागेवरून बाहेर येत दानवे यांनी लाड यांना थेट शिवीच दिल्याने झालेल्या हमरीतुमरीत सभागृहातील चर्चा की गल्लीबोळातले भांडण, याचे भानही सदस्यांना राहिले नाही. राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसविले. यावेळी लाड यांनी घोषणा दिल्या, त्यामुळे गोंधळ होऊन कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा, अशी मागणी केली.
Monsoon Session : दीक्षाभूमीच्या मुद्द्यावरून विधानसभेत वडेट्टीवार आक्रमक
विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले असता लाड यांनी हातवारे केले. त्याला आक्षेप घेताना दानवे हे आक्रमक झाले. आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. लाड यांच्याकडूनही शिवीगाळ झाली. अखेर उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. आता हाच वाद आंदोलनावर येऊन पोहचला. 2 जुलै रोजी आमदार लाड यांनी दानवे यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केले.
सभापतींचे खडेबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानावरून प्रसाद लाड आणि दानवे यांच्यात वाद झाला. यानंतर आता लाड यांनी दानवेंनी आपल्या मातोश्रींची माफी मागण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती. पण, सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांना सभापतींनी खडेबोल सुनावले. सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे. ही कसली संस्कृती आहे. त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे. कारण, अशा वक्तव्यामुळे चुकीचा पायंडा पडेल, असं डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात वापरलेल्या आपल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले आहे. मी समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी शिवसैनिक आहे. त्याच बाण्याने उत्तर दिले, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्यावतीने देखील दानवे यांची बाजू घेत त्यांचे समर्थन करण्यात आले होते.