Hingoli : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर पाटील म्हणाल्या, मी गेल्या दहा वर्षांत खूप काही शिकले. मी भाजपची आभारी आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान हिंगोली मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोडण्यात आला होता. त्यामुळे कदाचित पाटील यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाते तोडल्यानंतर 2014 मध्ये सूर्यकांता पाटील भाजपमध्ये दाखल झाल्या. सूर्यकांता पाटील यांनी मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाले नाही. उमेदवारी न मिळाल्याने पाटील यांनी सोशल मीडियावर नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती.
कोणालाही दोष नाही
उमेदवारी वाटपाच्या वेळी हिंगोली मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोडण्यात आला. निवडणुकीदरम्यान भाजपने पाटील यांना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून पराभव झाला. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पाटील नाराज होत्या. परंतु त्यांनी नाराजी व्यक्त करताना कोणत्याही नेत्याला दोष दिला नाही.
पाच वेळा प्रतिनिधित्व
सूर्यकांता पाटील यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली. पाटील यांच्या राजकीय आलेखाचा विचार केला तर त्या चार वेळा खासदार होत्या.
विधानभा निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या. हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु भाजपने त्यांना धक्का दिला व निवडणूक ठाकरे गटाने महायुतीला धक्का दिला. त्यामुळे महायुतीची एक जागा घटली.
पुढील निर्णयाची प्रतीक्षा
सूर्यकांता पाटील यांनी जाहीर केले होते की, त्या केंद्रीय राजकारणातून निवृत्त होतील. परंतु त्यानंतरही त्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर सूर्यकांता पाटील कोणत्या पक्षात जातील याची चर्चा होत आहे. पाटील काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्हींच्या त्या संपर्कात आहेत. त्यामुळे कदाचित त्या या दोनपैकी एका राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे.