Court Verdict : निवडणुकीत सारखे नाव असलेल्या उमेदवारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती सतीश चंद्र आणि न्यायमूर्ती संदीप शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, जर कोणाचे नाव राहुल गांधी किंवा लालू यादव असेल तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही. हा निर्णय देण्यात आला आहे.
कोणी केली होती याचिका
याचिकाकर्ते साबू स्टीफन यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यात असा युक्तिवाद केला होता की मतदारांची दिशाभूल करण्यासाठी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना हाय-प्रोफाइल जागांवर उभे केले जाते. याचिकाकर्त्यांनी भर दिला की अशा उमेदवारांच्या उपस्थितीमुळे चांगले उमेदवार कमी फरकाने पराभूत झाले आहेत. मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी ही प्रवृत्ती थांबावी यासाठी तातडीनं पावलं उचलण्यासाठी हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे. अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
कोर्टाने फटकारत निर्णय दिला
मुलांचे नाव त्यांचे पालक ठेवतात. एखाद्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव इतर कुणाच्या नावावर ठेवलं असेल, तर त्याला निवडणूक लढवण्यापासून कसं रोखता येईल? यामुळे त्यांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही का? खंडपीठाने याचिकाकर्त्याला सांगितले की, तुम्हाला माहिती आहे की या खटल्याचे भवितव्य काय असेल. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली.