महाराष्ट्र

Supreme Court  : दादा की काका? राष्ट्रवादी कुणाची?

NCP Politics : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

Supreme Court Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१६) सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. भुयान यांच्यासमक्ष ही सुनावणी होऊ शकते. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? चिन्ह कुणाचं? याचा फैसला या सुनावणीत होईल. 

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. यावरही आज सुनावणीची शक्यता आहे.

 

राज्यात सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावरुन वाद सुरु झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडले. त्यातच निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असं नाव दिलं होतं. त्यासोबतच त्यांच्या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असं चिन्ह दिलं होतं. शरद पवारांनी यंदाची लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढवली. या चिन्हावर निवडणूक लढवत शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला. आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायलय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभेलाही तुतारीच ?

पुढील आदेशांपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे चिन्ह असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहू शकतं, असं मत अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या आधीच व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!