महाराष्ट्र

Lok Sabha Election : ताकदीन लढायचे अन् युद्धात जिंकायचे

Buldnaha Constituency : शेतकरी नेते रविकांत तुपकर समर्थकांचा निर्धार

Ravikant Tupkar : कोणत्याही परिस्थितीत ‘लढायचे आणि जिंकायचे’ असा निर्धार बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष असलेले उम्मेदवार रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी केला आहे. बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे रविकांत तुपकरांच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांची तुपकरांच्या उपस्थितीत अतिशय जोशपूर्ण वातावरणात बैठक पार पडली. बैठकीला असलेल्या समर्थकांच्या गर्दीने हा निर्धार केला आहे.

तुपकर 2 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या दिवशी होणारी सभा हीच आपली मुख्य सभा असणार आहे. त्यामुळे या सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशा होणार्‍या लढाईत सहभागी होवून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी केले. तुपकर हे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून 2 एप्रिल अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच बुलढाणा तालुक्यातील सातगाव येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात केली होती.

अनेक वर्षांचा लढा

शेतकरी-कष्टकर्‍यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर गेल्या 22 वर्षांपासून लढा देत आहेत. आजवर त्यांनी या प्रश्नावर अनेकवेळा तुरूंगवास भोगला आहे. तडीपारही झाले आहेत. पोलिसांचा लाठीमार सहन केला. त्यांच्या या लढ्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात नेहमीच काही न काही पडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत रविकांत तुपकर यांना साथ देण्याचा निर्धार सर्वसामान्य जनतेने बांधल्याचा दावा केला जात आहे. तुपकर जेथे जातील तिथे त्यांच्या सभांना नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. जनताच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर आपल्या कशाची भीती, त्यामुळे आता ताकदीने लढायचे आणि जिंकायचे, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी रविकांत तुपकरांनी उपस्थिताना संबोधित करताना आपण शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!