संपादकीय

Ravi Rana : वाढत्या प्रस्थाने भाजपात अस्वस्थता

Assembly Election : निवडणुकीत बदलेकी आग चित्रपट

या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित’ सहमत असेलच असं नाही.

BJP With Ravi Rana : राजकारणात सर्व प्रकारची माणसे असतात. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार राजकारण खेळत असतो. या क्षेत्रात काहिंना यश मिळते. काही अपयशी ठरतात. काही बेरकी मंडळी अगदी नियोजनपूर्वक या क्षेत्रात येतात. राजकारणात यशस्वी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा विचार करूनच ते या क्षेत्रात उतरतात. आता राजकारण हे ध्येयाने पछाडलेल्या, समाजासाठी काहीतरी करु पाहणाऱ्याया व्यक्तींचे क्षेत्र राहिलेले नाही. सर्वच बाबतीत समृद्ध असणाऱ्या व्यक्तींची येथे चलती आहे.

धनदांडग्या तसेच आपल्या मनासारखे काहीही घडवून आणू शकणाऱ्या व्यक्तींचे हे क्षेत्र झाले आहे. ‘अपने पे भरोसा है तो दाव लगा ले’ सारखा हा प्रकार आहे. अमरावती येथील रवी राणा हे याच व्याख्येत बसणारे व्यक्तिमत्व आहे. आमदार रवी राणा अमरावती नजीकच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत.‌ युवा स्वाभिमान या लहान पक्षाचे ते सर्वेसर्वा आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून सलग तीन वेळा ते स्वतःच्या बळावर निवडून आले आहेत. आता ते चौथ्यांदा आपले भाग्य आजमावित आहेत.

महायुतीचे पाठबळ

रवी राणा यांना यावेळेस महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीत पाठिंबा मिळाला आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. आता तर ते भाजप आपलीच आहे, या आविर्भावात वावरताना दिसतात. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. निवडणुकीपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आमदार बच्चू कडू आणि राणा यांच्यात टोकाचे राजकीय वैर आहे. बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत ‘प्रहार’चा उमेदवार दिला होता.

अमरावतीत मत विभागणीचा फटका बसल्याने नवनीत राणा पराभूत झाल्या. या पराभवाचा वचपा काढण्याचा पूरेपूर प्रयत्न राणा दाम्पत्याने या विधानसभा निवडणुकीत चालविला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेचा मुद्दा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उचलला होता. आता आनंदराव अडसूळ यांचा मुलगा माजी आमदार अभिजित अडसूळ दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

Assembly Elections : महाराष्ट्रातील ‘पॉवरफुल्ल’ नेत्याच्या प्रचारार्थ येणार आंध्रप्रदेशातील ‘पॉवरस्टार’

विरोधात प्रचार

माजी आमदार अभिजित अडसूळ महायुतीचे उमेदवार असूनही नवनीत राणा या त्यांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. युवा स्वाभिमान पक्षाने भाजप बंडखोर उमेदवार रमेश बुंदेले यांना उमेदवारी दिली आहे. अडसूळ यांना पाडण्यासाठी नवनीत राणा रमेश बुंदेले यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. या प्रकाराबाबत भाजपचे नेते नाराजी व्यक्त करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही राणा यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, अशा कडक शब्दात सुनावले. त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ही नवनीत राणा यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. महायुती उमेदवाराचे विरोधात करीत असलेला प्रचार थांबवावा, असे सांगितले. नवनीत राणा यांनी त्याला दाद दिली नाही. अमरावती मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुलभा खोडके निवडणूक लढवित आहेत. त्याच्याही विरोधात राणा दाम्पत्य काम करीत आहेत. या पक्षविरोधी कारवाया सुरू असूनही पक्षाने मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली, नाही याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

Akola West : महायुतीमधील धनुष्यबाणाचे शेगडीला बळ

निष्ठावंतांवर अन्याय

बडनेरा मतदारसंघाची उमेदवारी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तुषार भारतीय यांनी महायुतीकडे मागितली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना आधीच शब्द देवून ठेवला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आजही भाजप वर्तुळात राणा यांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मूग गिळून त्यांना गप्प राहावे लागत आहे. राणा यांचे भाजपमधील प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं भाजप वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. पक्षश्रेष्ठी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. निष्ठावंत नेते काळजी व्यक्त करताना दिसतात.

निर्णय घेणाऱ्या व्यक्ती मात्र या गंभीर प्रकाराची दखल घेण्यास कचरत आहेत. रवी राणा यांचा भाजपमधील वावर आणि प्रस्थ वाढत आहे.

अमरावती जिल्ह्यातून भाजपचे अस्तित्व खिळखिळे करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. पक्षविरोधी कारवाया वाढल्या आहेत. त्यांचा फटका निवडणुकीत नक्कीच बसणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. तुषार भारतीय याचाच पुनरुच्चार करताना दिसतात. त्याची दखल कुणीच घेत नाही ही शोकांतिका आहे.

पक्षावर हुकुमत

लहान पक्ष चालवणारा एक नेता केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेमुळे भाजपसारख्या पक्षांवर हुकुमत गाजवताना दिसतो. स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांच्या आदेशाचे पालन करतात, असा लाजीरवाणा, संतापजनक प्रकार येथे बघायला मिळतो. रवी राणा यांनी भाजपला ‘हायजॅक’ केले, अशी चर्चा म्हणूनच अमरावती येथे उघडपणे सुरू आहे. मैत्री, व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध असणे हा वेगळा विषय आहे. मैत्री जपताना समूहमनाचा अनादर करणे केव्हाही हितकर ठरत नाही. निवडणूक किंवा राजकारण हे बदला घेण्याचे क्षेत्र असूच शकत नाही. येथे तर सारेच विपरीत दिसून येत आहे. बडनेरा मतदारसंघात ‘बदले की आग’ या चित्रपटातील कथानक सुरू आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!