लोकसभेत निर्विवाद विजय मिळवून काँग्रेसने भंडारा गोंदिया मतदार संघावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्राप्त केले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी समिकरणे जुळविली जात आहेत. यात आता विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे डॉ. प्रशांत पडोळेंच्या विजयापेक्षा सुनील मेंढे यांच्या पराभवाचीच चर्चा सर्वत्र आहे.
सुनील मेंढे यांच्या पराभवामुळे अनेक विद्यमान आमदारांच्या भवितव्यावर प्रभाव पडणार आहे. यात महायुतीमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचाच ‘गेम’ होतोय की काय, अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विधान सभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल जाहीर होताच विधानसभेची आकडेमोड करण्यास सुरुवात झाली आहे.
भंडारा-गोंदिया मतदार संघात भंडारा, साकोली, तुमसर, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. सहापैकी भंडारा, साकोली, तुमसर आणि अर्जुनी मोरगाव या 4 विधानसभा क्षेत्रात डॉ. पडोळे यांनी तर गोंदिया आणि तिरोडा या 2 विधानसभा क्षेत्रात मेंढे यांनी आघाडी घेतली. मागील वेळीच्या तुलनेत मेंढे यांना साधारणतः एक लाख मतांचा फटका बसला. ज्यात भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा मिळून सुमारे 59 हजार मतांची वजाबाकी झाली.
मित्र पक्षांना मोठे आव्हान
भंडारा जिल्ह्यातील भंडारा विधानसभेत सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसर क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे तर साकोली विधानसभेत नाना पटोले आमदार आहेत. लोकसभा निकालाअंती विधानसभानिहाय आकडेवारी बघता या तीनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भाजप आणि एकंदरीतच महायुतीतील मित्र पक्षासाठी देखील मोठे आव्हान असणार आहे.
भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात सुनील मेंढे तब्बल 23 हजार मतांनी मागे पडले. भंडाऱ्यात सुनील मेंढे मागे जाण्याचे मुख्य कारण भाजपचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. शिवाय मेंढे आणि डॉ. परिणय फुके यांच्यातील अंतर्गत धुसफूसही कारणीभूत ठरलीच.
पक्षश्रेष्ठीसमोर एकत्र असल्याचा आभास निर्माण केला गेला तरी तिकीट न मिळाल्यामुळे फुके आणि त्यांच्या समर्थकांनी मेंढे यांना साथ दिलीच नाही. शिवाय शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पंचबुधे यांनीही मेंढेंना पाहिजे तशी साथ दिली नाहीच. येथे भाजप आणि मित्रपक्षांनी मेंढे यांना तोंडघशी पाडलेच मात्र मतदारांची नाराजीही त्यांना भोवली.
नगराध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांची निष्क्रियता आणि आश्वासनांची पूर्तता करण्यात ते सपशेल अपयशी ठरले. शहरातील रस्ते, पाणी, अतिक्रमण, पार्किंगची समस्या, उद्याने या मुद्यावरून मतदारांनीही येथे त्यांना नाकारले. भंडाऱ्यात काँग्रेसची आघाडी बघता येथे आता अपक्ष उमेदवारलाही जड जाणार हे मात्र निश्चित.