Assembly Election : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. अशा 27 बंडखोरांवर काँग्रेसने कारवाई केली. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यात राजेंद्र मुळक यांचे नाव आहे. तरीही राजेंद्र मुळक यांच्या पाठिशी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनिल केदार खंबीरपणे उभे आहेत. अनेकांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंसह राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांकडे याची तक्रार केली. पण केदार हटले नाहीत. रामटेक विधानसभा मतदारसंघात मुळक यांच्या प्रचारासाठी पारशिवनी येथे आयोजित सभेत केदार यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणाऱ्यांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी रामटेकचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार आशिष जयस्वाल यांना थेट इशारा दिला.
केदार म्हणाले, रामटेकच्या आमदाराला सत्तेचा माज आला आहे. मुख्यमंत्री येतात, तेव्हा ते बोलतात. परंतु त्यांना काहीच समजत नाही. उद्धव ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना त्यांनी जागा दाखवण्यासाठी आम्ही ठरवलं आहे. तुम्हाला वाटेल तसं बोलणार का, असा प्रश्नही केदार यांनी केला. जयस्वाल यांच्यापासून आम्ही बदला घेणार आहोत. ‘मातोश्री’वर बोलणाऱ्याला जागा दाखवतो, असेही सुनिल केदार यांनी राजेंद्र मुळक यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हटले.
जयस्वालांची टीका
केदार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, ते कोणालाही आडून नाही तर समोरूनच प्रत्युत्तर देतात. आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करावं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आजही आहोत. पुढेही राहणार आहोत, असं सांगत केदार यांनी ठामपणे नमूद केलं. महायुतीच चांगली होती, असं बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, असं जयस्वाल म्हणाले होते. भाजपसोबतची महायुती तोडून आपण काय साध्य केलं. हे आपण काय करून चुकलो, असं डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे, अशी टीका जयस्वाल यांनी केली होती.
Bhagyashree Atram : हे काय आता..भाग्यश्री आत्रामांच्या पतीची गर्लफ्रेंड
रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेचच्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामटेकमधील महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सत्तेमध्ये घेऊन पुन्हा जीवंत केले. हिच काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासोबत दगा करीत आहेत. काँग्रेस ठाकरेंशी किती प्रमाणात राहते, हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल. त्यामुळे हे आपण काय करून चुकलो आहे, हे डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येईल. ठाकरे यांचे हाल होत आहेत. ते आपल्याला बघवत नाही, असंही आशिष जयस्वाल म्हणाले होते.