सुनील केदार सावनेरचे पाच टर्मचे आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मिनिस्टरही होते. त्यांचा तसाही दबदबा आहेच. पण शिवसेनेचा गड असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ सुनील केदार यांनी काँग्रेसच्या बाजुने झुकवून दिला. त्यामुळे त्यांचं वजन चांगलच वाढलं आहे. मात्र त्याचे परिणाम महाविकास आघाडीतील इतर पक्षांना भोगावे लागत आहेत. केदार जिल्ह्याचे तारणहार होण्यासाठी धडपडत आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभा निवडणुकीत सुनील केदार यांच्यावर रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. केदार यांनी या सर्व ठिकाणी उमेदवार ठरविण्यात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातही त्यांनी आघाडीतील इतर पक्षांचं टेंशन वाढवलं आहे. विशेषतः जिल्ह्यामध्ये सावनेर मतदारसंघ तर त्यांच्याकडेच आहे. याठिकाणी त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. याशिवाय उमरेड, रामटेक, हिंगणा याठिकाणी देखील आपल्या जवळच्या लोकांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.
सुनील केदार यांचा आग्रह उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी एकप्रकारे आदेशाप्रमाणेच आहे. कारण केदार यांनी प्रतिष्ठेची लोकसभा निवडणूक नव्या उमेदवारावर दाव लावून जिंकून दिली आहे. रामटेक मतदारसंघ अनेक वर्षे काँग्रेसकडे आहे. पण याठिकाणी ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. केदार यांनी मात्र रामटेकचा उमेदवार आपणच ठरवणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला एक पाऊल मागे जाण्याशिवाय पर्याय नाही.
उमरेड तसा काँग्रेसचा मतदारसंघ होता. पण 2009 व 2014 मध्ये भाजपच्या सुधीर पारवेंनी परंपरा खंडीत केली. मात्र, 2019 मध्ये राजू पारवे यांनी हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणला. आता राजू पारवे शिंदे गटात आहेत. त्यामुळे केदारांनी तिथेही आपला झेंडा गाडून ठेवला आहे. उमरेडमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी देखील सुरू झाली आहे. हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. पण केदारांनी त्यांच्या समर्थकासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेसला जागा द्यायची नसेल तर माझ्या माणसाला शरद पवार गटात पाठवतो, उमेदवारी द्या, असा संदेशच त्यांनी दिला आहे.
सुनील केदार लढणार की नाही?
सावनेरमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविणारे सुनील केदार यंदा लढणार नाहीत, अशी चर्चा होती. असे झाले तर केदारांचा पर्याय काँग्रेसला शोधावा लागेल. त्यासाठी माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपूत्र डॉ. अमोल देशमुख यांनी तयारी केली आहे. तसे झाल्यास भाजप एखादा तगडा उमेदवार सावनेरमधून उभा करू शकते. सावनेरमधील काँग्रेसचे गेल्या अडिच दशकांचे वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.