महाराष्ट्र

Sunil Deshmukh : मुंबई, पुणे, नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे काय?

Union Budget : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल

Nagpur : अर्थसंकल्पावर टीका करताना राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ‘फक्त मुंबई, पुणे, नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे काय?’ असा सवाल केला आहे. काही अपवाद वगळता विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केलेला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वर्ष 2024 -25 करिता देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एका बाजूने विद्यमान सरकारला टेकू दिलेले आंध्र प्रदेश व बिहारवर प्रचंड निधीचा वर्षाव करण्यात आलेला आहे. या उलट केंद्रीय करांमध्ये सर्वाधिक वाटा देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाने पुसली आहेत, अशी टीका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोण म्हणतो महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही..?’ असा कोडगा सवाल केला आहे. वस्तूतः महाराष्ट्रातील केवळ मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्प, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP), नागपूर मेट्रो, नागपूर नाग नदी प्रकल्प, पुणे मेट्रो, पुणे मुळा-मुठा संवर्धन प्रकल्प यांचा उल्लेख आहे. हा अपवाद वगळता विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही.

यावरून महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरच आहे काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाने पुसल्याचे ताशेरे माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ओढलेले आहे.

वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आता राज्यपालांची मान्यता मिळालेली आहे. त्याचे काम अग्रक्रमाने करण्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी मागेच केले होते. याकरिता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये फुटकी कवडी सुद्धा दिली नसल्याचे जळजळीत वास्तव आहे. दर दिवशी शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य नवनवे कीर्तिमान स्थापन करीत आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशावेळी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी साधे पॅकेज तर सोडा याबद्दल अवाक्षरही अर्थसंकल्पात नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

फक्त 600 कोटींची तरतूद

मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रो, एमयूटीपी, नाग नदी, मुळा-मुठा नदी संवर्धन यासारख्या व इतर तत्सम प्रकल्पांकरिता साधारणतः 5331 कोटी रुपयांची तरतूद आहे. तर या उलट विदर्भ मराठवाडा येथील सिंचन प्रकल्पांसाठी केवळ 600 कोटींची तरतूद केलेली आहे. वस्तूतः विदर्भ मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष अद्यापही भरून निघालेला नसताना किमान एक रकमी 5000 कोटी रुपयांची तरतूद करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, ना केंद्र ना राज्य सरकारने हे केले, अशी टीका देशमुख यांनी केली.

सुड उगवत आहात का?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण महाराष्ट्राने भाजपला हद्दपार केले. याचा सुड केंद्रातील मोदी-शहा जोडी या भागातील नागरिकांवर उगवत आहे काय..? असा संतप्त सवाल सुद्धा डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!