Sumit Wankhede : ज्याची सत्ता असेल तोच पॉवरफूल्ल, हे अंतिम सत्य आहे. कितीही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले तरी विरोधकांना सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये कामं करून घेण्यासाठी सरकारला निवेदनंच द्यावी लागतात. मात्र सरकारच्या पॉवरचा कसा परिणाम होऊ शकतो, याची प्रचिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षांत दिली आहे. पहिल्यांदा सत्ता आल्यापासून आपल्या दोन स्वीय सहायकांना त्यांनी आमदार केले. आता सुमित वानखेडे यांच्या निमित्ताने तिसऱ्यालाही संधी मिळाली आहे.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार राज्यात आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे स्वीय सहायक होते. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2019 मध्ये फडणवीस यांनी पवार यांना औसा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. ते विजयी झाले आणि यंदा पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे.
श्रीकांत भारतीय यांना संधी
फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय हे त्यांचे ओएसडी होते. ते अमरावतीचे रहिवासी आहेत. पवार यांचा राजकारणात रस होताच. पक्षाच्या पदांवरही ते होते. पण, त्यांच्यावर फडणवीस यांच्या कार्यालयाची महत्त्वाची जबाबदारी होती. 2022 मध्ये त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी भाजपमधील अनेक दिग्गज इच्छुक होते. मात्र फडणवीस यांनी श्रीकांत भारतीय यांना संधी दिली. ते सध्या विधान परिषदेत आमदार आहेत.
या दोघांचा अनुभव लक्षात घेता आता फडणविसांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांचेही भाग्य खुलणार का, अशी चर्चा होऊ लागली आहे. सुमित वानखेडे यांना भाजपने आर्वी विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. सुमित वानखेडे 2014 च्या पूर्वीपासून फडणवीस यांच्यासोबत आहेत. फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी काम बघितले होते. खासगी सचिव, स्वीय सहायक अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. दरम्यान, 2019 मध्ये अचानक त्यांचे नाव आर्वीसाठी चर्चेत आले. पण तेव्हा संधी हुकली.
पीए टू आमदार?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना वर्धा लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून आर्वीमध्ये मोर्चेबांधणी करण्याचे ते फलित होते. त्यातूनच विधानसभेसाठी त्यांचा मार्ग मोकळा आहे, असे भाकित करण्यात आले होते. आर्वीतील प्रत्येक कार्यक्रमात, सोहळ्यात त्यांची उपस्थिती राहू लागली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुमित वानखेडे यांनी विधानसभेची उमेदवारी मिळणे आश्चर्याचे नाही. मात्र, विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा दावा डावलून त्यांना उमेदवारी मिळाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. वानखेडे विजयी झाल्यास पीए टू आमदार असा प्रवास करणारे ते तिसरे आमदार ठरतील.