Political War In Ambanagri : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीतील विधानसभा निवडणुकीत यंदा अजितदादांच्या पक्षातील ताई दोन माजी मंत्र्यांना टक्कर देणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा ठपका ठेवल्यानंतर काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षानं बाजू मांडण्याची संधी न दिल्यानं खोडके यांना अपमानच झाला. काहींच्या सांगण्यावरून हा आरोप करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांचा रोख माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडं होता. आता सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं आहे.
देशमुख यांना उमेदवारी
खोडके मार्गातून हटल्यानंतर काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यातच भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता या दोन्ही माजी आमदारांना सुलभा खोडके आव्हान देणार आहेत. गुप्ता यांचं मन वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. अमरावतीचे संजय खोडके हे अजित पवार यांचे नीकटवर्तीय आहे. त्यामुळं काँग्रेसनं कारवाई केल्यानंतर सुलभा खोडके राष्ट्रवादीत जातील हे निश्चित मानलं जात होतं. झालंही तसंच. त्यामुळं दादांच्या शब्दाखातर आता भाजपला गुप्ता यांची समजूत काढावी लागणार आहे.
कार्यकाळ संपला अन्..
अमरावती विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष सुनिल देशमुख हे आमदार होते. डॉ. सुनिल देशमुख हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. अमरावती शहराने विकास काय असतो, हे त्यांच्या काळात पाहिलं. अमरावतीमधील प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आदी अनेक कामं देशमुख यांच्या काळात झालीत. मात्र प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसनं देशमुखांचा पत्ता कापला. पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली. अमरावतीकरांना शेखावत यांच्याकडून यापेक्षा दहापट अपेक्षा होती. कारण त्यांच्या मातोश्री राष्ट्रपती होत्या. पण लोकांच्या अपेक्षा शेखावत यांनी फोल ठरविल्या.
शेखावत अमरावतीसाठी काहीच करू शकले नाहीत. पाटील यांच्या राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपताच मतदारांनी शेखावत यांच्याकडे लोकांनी पाठ फिरवली. भाजपमध्ये असलेल्या सुनिल देशमुख यांना मतदारांनी कौल दिला. आमदारकीची ‘टर्म’ पूर्ण झाल्यानंतर व नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शेखावत यांनी अमरावतीकरांना ‘हम आपके है कौन..’ म्हणत गावच बदलून टाकलं. आता शेखावत ‘टुरिस्ट’सारखे अधूनमधून अमरावतीत येत असतात.
स्वत:चं केलं ‘स्कॅनिंग’
दोन्ही वेळा रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर देशमुख यांनी बंड केलं. ते दुसऱ्या पक्षांमध्येही फिरून आले. पण त्यांना मोकळा श्वासच घेता येत नव्हता. पेशाने एमबीबीएस, एमडी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर असलेल्या सुनिल देशमुख यांनी मग स्वत:चंच ‘स्कॅन’ केलं. आपल्याला नेमका कशामुळे श्वसनाचा त्रास होतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला ‘ऑक्सिजन’ मिळेल ते काँग्रेसमध्येच. त्यामुळे ‘सुबह का भुला, शाम को घर वापस’ सारखं काही काळापूर्वी देशमुख यांचं काँग्रेसमध्ये ‘कमबॅक’ झालं. आता त्यांना काँग्रेसनं उमेदवारही केलं आहे.
अस्वस्थता..
सुलभा खोडके यांना उमेदवारी दिल्यानंतरही काँग्रेसमध्ये अस्वस्थता होतीच. मात्र देशमुख यांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ करीत योग्य संधीची प्रतीक्षा केली. विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी करेक्ट टायमिंग साधलं अन् सुलभाताई काँग्रेसमधून ‘आऊट’ झाल्या. आता त्या दोन्ही माजी मंत्र्यांना आव्हान देऊन मैदानात उतरल्या आहेत. अशात अमरावतीमधील मतदारांनी माजी मंत्री म्हणून जगदीश गुप्ता, सुनिल देशमुख आणि आमदार म्हणून सुलभा खोडके यांनी शहरासाठी काय काय केलं, हे पाहिलं आहे. घोडा मैदान जवळ आहे. लवकरच मतदार तीनही उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. त्यामुळे अमरावतीचे मतदार दादांच्या पक्षातील लाडक्या बहिणीला कौल देतात की, त्यांच्या विरोधातील दोन भाऊंपैकी एकाला हे स्पष्ट होणार आहे.