Legal Notice Issue : महाविकास आघाडीतील नेत्यांना नोटीस पाठविण्यावरून सध्या राजकारण तापले आहे. यावर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीकडून सहानुभूती मिळविण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. सुरेश कलमाडी यांना नोटीस बजावण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात असताना देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठविण्यात आली होती. नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी लोकशाही कुठे गेली होती, असा सवालही मुनगंटीवार यांनी केला. नागपुरात आयोजित भाजपच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्या संस्थांना कामच करु द्यायचे नाही, असा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. राजकीय नेता म्हणून कोणालाही विशेष कवच नाही. मात्र आपल्याला सारेकाही माफ आहे, असा भाव आणला जात आहे. ही धारणा अयोग्य आहे. तपास यंत्रणांनी कारण विचारले त्यामुळे राग येण्याचे काहीच औचित्य नाही. कायदा प्रत्येकासाठी सारखाच असतो, असे मतही मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
आधी सांगायचे असते
अजित पवार महाविकास आघाडीत असचे तर मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. अजितदादा सोडून गेल्यानंतर आता जयंत पाटील बोलत आहेत. दादा महाविकास आघाडीत असताना जयंत पाटलांनी हे सांगितले असते तर दादांचा काही फायदा झाला असता. आता अजित पवार यांच्यासंदर्भात नवीन डाव आखण्यात आला आहे. दादांना असे सांगून होणारा पराभव कमी करता येईल का, याचा हा प्रयत्न असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राजकीय सर्वेक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षात आपल्या पातळीवर सर्वेक्षण सुरू असते. निरंतर चालणारी अशी ही प्रक्रिया आहे. त्यात नवीन काहीच नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
लोकांच्या मताची जाणीव
केवळ जागा वाटपांबाबत सर्वेक्षण नसते. सरकारी योजनांबाबत जनतेचे काय मत आहे? हे देखील वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतले जाते. जनमानसात सरकारबद्दल कोणता विचार आहे, हे देखील सर्वेक्षणातून पुढे येत असते असे ते म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह इतर योजनांचा ‘फिडबॅक’ मिळत असतो. महाविकास आघाडी, महायुतीबाबत मतंही माहिती करून घेतली जातात. सर्वेक्षणातून येणाऱ्या निष्कर्शातून गंभीरपणे विचार केला जातो.सर्वेक्षणाच्या आधारावर तिकीट कापण्यात येत नाही. केवळ लोकांची मतं जाणून घेतली जातात, असे मुनगंटीवार म्हणाले.
राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी सर्वेक्षणाबाबत वक्तव्य केले. त्यांना खास रिपोर्ट मिळाले असतील असा टोलाही वनमंत्र्यांनी लगावला. महाविकास आघाडीचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत. संजय राऊत चुकीने महायुतीचा रिपोर्ट म्हणले असतील. महाविकास आघाडीचे सर्वेक्षण करणाऱ्यांना भीती वाटते. चुकीचा रिपोर्ट दिला, तर पैसे मिळणार नाही. त्यामुळे सवेक्षण करणारे त्यांना नेहमी सकारात्मक असल्याचेच सांगतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, संघ राजकारणात नाही. संघ राजकारण करीत नाही. निवडणुकीत चांगल्या आणि सक्षम उमेदवाराला संघ मदत करतो. देश हितासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीने डागली महायुतीवर तोफ
ऑक्टोबरमध्ये निवडणूक शक्य
विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ शकते असा अंदाज सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तीन राज्यात निवडणूक घ्यायची आहे. हरियाणाचे सरकार पाच नोव्होंबरपर्यंत स्थापन करायचे आहे. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. डिसेंबर महिन्यात झारखंडमध्ये सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना तीनही राज्यातील निवडणुकीसाठी सोयीचा ठरू शकतो. त्यामुळे कदाचित ऑक्टोबरमध्ये निवडणूक होऊ शकते, असा अंदाज मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
भाजप जातीवर आधारित राजकारण करीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ओबीसी आहे. काँग्रेसचे नेते ब्राह्मण आहेत. ते स्वत:ला ब्राह्मण घोषित करतात. आपण जानवेधारी ब्राह्मण असल्याचे ते सांगतात. दत्तात्रय गोत्र सांगतात, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले. मुळात भाजपला जात मान्यच नाही. जातीवर आधारित राजकारण भाजप कधीच करीत नाही. जातीमुक्त राजकारण करणारा एकमेव पक्ष भाजपच असल्याचे मुनगंटीवार ठामपणे म्हणाले. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की, राणा गमतीने बोलले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी भांडण सुरू आहे. त्यांना पदाची लालसा आहे. राज्याचे त्यांना काहीच देणेघेणे नाही,असेही मुनगंटीवार म्हणाले.