Ballarpur : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भातून सलग सातव्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य घेत निवडून येण्याचाही विक्रम यावेळी आपल्या नावे केला. यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभूर्णा येथे आदिवासी समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या विजयाचे श्रेय त्यांनी आदिवासी समाजासोबतच सर्व समाजबांधवांना दिले.
आठवणी
आपल्या आणि महायुतीच्या विजयामध्ये राज्यातील लाडक्या बहीणींचा वाटा मोठा असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. प्रचाराच्या वेळीच्या काही आठवणी त्यांनी आजच्या (10 डिसेंबर) सोहळ्यात सांगितल्या. ते म्हणाले प्रचारादरम्यान जेव्हा मी मतदारसंघात फिरत होतो. तेव्हा लाडक्या बहिणीं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. मतदानादरम्यानही लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठ्या संख्येने बुथवर होती. प्रचारादरम्यान आमच्या लाडक्या बहीणींनी नवनवीन नारे दिले.
‘कटोरी में जिरा है, सुधीरभाऊ हिरा है’, असे नवनवीन नारे लाडक्या बहीणींनी दिले. याचा मनापासून आनंद आहे. हृदयामध्ये प्रेम घेऊन उपस्थित झालेल्या बांधवांनी, माता, भगीणींनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार मानतो. आज आपण जे स्वागत केलं, सत्कार केला. यामुळे मतदारसंघात काम करण्याची ऊर्जा मिळाली. जगन येलके, गणेश परचाके आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो. कारण याच मैदानावर त्यांनी मला समर्थन दिले होते. निवडणुकीत त्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती, असे सांगत मुनगंटीवार यांनी आदिवासी समाज बांधवांचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी आणि महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. वेळेअभावी सर्वांची नावे घेऊ शकत नाही. आपण स्वतःच उमेदवार आहोत, असे समजून या निवडणुकीत पूर्ण शक्तीने सर्वांनी काम केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदार ईश्वराचा अंश आहे. मतदारांनी 25,985 मतांची लीड देऊन जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : ऐतिहासिक निर्णयांचा धडाका लावणारा हेविवेट नेता
नेहमी लाडक्या बहीणींसोबत..
चिंता करू नका, लाडक्या बहीणींसोबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमी उभा राहील. राजकारणाला मी सेवेचे माध्यम समजतो. या देशाचा प्रत्येक सुपुत्र सुखी व्हावा, या भावनेने काम करतोय. जगन येलकेंनी सर्वांना एकत्र केलं. तुमच्या धर्मस्थानावरही आलो, आशीर्वाद घेतला. राजकारण्यांवर सामान्य लोकांचा विश्वास नसतो. पण मी पूर्ण शक्तीने आपल्या सोबत आहो असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थितांना दिला. पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा, यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करत राहीन, असे सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.