Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई कराल तर खबरदार
Administrative Meeting : राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय कमी आहे. हा वेग वाढविण्याची गरज आहे. व्यवस्थापक किंवा संबंधित अधिकारी उपलब्ध नसतील तर शेतकऱ्यांची कामे खोळंबतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशात त्यांची अडवणूक होत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. एखादा अधिकारी कामावर नसेल तर त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची तत्काळ नेमणूक करा, अशा सक्त सूचना चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
चंद्रपुरातील नियोजन सभागृह मुनगंटीवार यांनी कृषी विभाग व कृषी विभागाशी संलग्नित अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खरीप हंगामातील कामांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा असतो. त्यामुळे ऐन हंगामाच्या वेळी जर कोणी त्यांची अडवणूक करीत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कर्जवाटपावर नाराजी
चंद्रपुरातील कर्जवाटपाची स्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून द्या, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालका प्रीती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, रामपालसिंग यांच्याकडूनही त्यांनी हंगामाची सद्य:स्थिती जाणून घेतली.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
शेतकऱ्यांनी पीक कर्ज वाटप करण्यासाठी गरज भासली तर बँकांनी विशेष शिबिर घ्यायला हवे. बँकांच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामाचे दिवस महत्वाचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामे तत्काळ व्हावी, यासाठी बँकांनी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. 20 ते 22 ग्रामपंचायत संलग्न असलेल्या एखाद्या बँकेत केवळ 80 शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत असेल, तर हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. अमूक अधिकारी रजेवर आहे. साहेब बाहेर गेले आहेत वैगरे कारण सांगता येणार नाही. त्यासाठी एखादा अधिकारी नसेल तर पर्यायी मनुष्यबळ आधीच नियुक्त करा, असे मुनगंटीवार म्हणाले.
समाधानही केले व्यक्त
कर्ज वाटपाच्या विषयावर जिथे मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली तिथे पीक विमाबाबत त्यांना समाधानही वाटले. शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. योजना येण्यापूर्वी केवळ 50 ते 60 हजार शेतकरी या योजनेत सहभागी होत होते. आता दरवर्षी जवळपास तीन लाख शेतकरी या योजनेत सहभागी झालेत.
Sudhir Mungantiwar : जेथे न पोहोचे डॉक्टर, तेथे पोहोचे ॲक्टर
हे चांगले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. कृषी विभागाने बी-बियाणे, खते यांच्या गुणवत्तेवरही लक्ष द्यायला हवे. अनधिकृत कापूस बियाणे विकले जात असतील तर वेळीच कारवाई व्हायला हवी. नैसर्गिक आपत्तीत खरीप व रब्बी हंगामातील नुकसानाची स्थितीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. आपत्तीमुळे नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले याबद्दल त्यांनी अहवालावर दृष्टीक्षेप टाकला. प्रलंबित कृषिपंप जोडणीची कामेही तत्काळ करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
लुटमार थांबवा अन्यथा..
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. ही संख्या वाढणार आहे. परंतु काही ठिकाणी कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुटमार होत आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे याची गंभीरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जर कोणी कागदपत्रांच्या नावाखाली अतिरिक्त भुर्दंड देत असेल, तर अशी लुटमार करणाऱ्यांचे काय करायचे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज भासू नये, अशी सक्त ताकीदही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.