महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. विरोधकांनी या योजनेची चांगलीच टिंगल टवाळी केली. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. झारखंडचे उदाहरण देत त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सभागृहात शुक्रवारी (ता. 9) भाजपचे मंडळ संमेलन पार पडले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे काय करावे, हे काँग्रेसच्या लोकांच्या लक्षातच येत नाहीये. त्यांनी हायकोर्टात लोक पाठवले. काही व्हिडिओ व्हायरल केले. कधी ते स्वतःच योजनेचे अर्ज भरून घेताना दिसतात. तर कधी विरोध करताना दिसतात. नेमके काय करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले आहे.
‘ते’ महाराष्ट्राचे शत्रू
‘लाडकी बहीण’ योजनेत सहभागी होण्यासाठी आपण काँग्रेसच्या लोकांना जबरदस्ती केलेली नाहीये. नसेल सहभागी व्हायचे तर होऊ नये. श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन त्यांनी शपथ घ्यावी की, योजनेत सहभागी होणार नाही. पण महाराष्ट्रातील महिलांचे नुकसान त्यांनी करू नये. हे लोक महाराष्ट्राचे शत्रू आहेत. झारखंडमध्ये त्यांचे सरकार आहे. हीच योजना यांनी तेथे राबवली. योजना येवढी वाईट आहे तर मग झारखंडमध्ये का घोषणा केली की, आम्ही 1000 देऊ. येथेच त्यांचा दुतोंडीपणा सिद्ध होतो. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा आम्ही सर्वात जास्त 1500 रुपये दिले, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
आम्ही अॅडव्हांटेज चंद्रपूर केले. हे कुणी ऐरू गैरू, नथ्थू खैरू करू शकत नाही. लोकसभेत कुणी निवडून गेला म्हणून तो हे काम करू शकतो, असे काहीही नाही आणि हे आपण घरोघरी जाऊन समजावून सांगितले पाहीजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते आवश्यक आहे. पीक विम्याचे २०२ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मंत्रालयात मी ठणकावून सांगितले की, जे अपात्र आहेत, त्यांनाही पीक विमा दिला पाहिजे.
काँग्रेसवाले काड्या करतात
14,700 कोटीची सूट शेतकऱ्यांना दिली. काँग्रेसवाले त्यातही काड्या करतात. धानाला 20000 रुपये बोनस दिला. महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट दिली. वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 3000 रुपये थेट टाकणार आहोत. खूप योजना आहेत. पण अंमलबजावणी मी एकटा करू शकत नाही, सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. भाजप महिला मोर्चा आणि भाजयुमोवर ही जबाबदारी आहे. त्या पोहोचवल्याशिवाय थांबू नका, असे आवाहन मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
काहींचा आत्मविश्वास डगमगला होता
सेवा हेच आपले उद्दिष्ट आहे. पण लोकसभेच्या पराभवानंतर काहींचा आत्मविश्वास डगमगला होता. आपण सर्वे केला आहे, आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त ताकदीने काम करण्याची गरज आहे.
आपली कृती, आचरण, वक्तृत्व, किंवा सोशल मिडियावरील पोस्ट पक्षाच्या विरोधात जाणार नाही, याची काळजी घ्या. बेसावध राहू नका. रोज एका कार्यकर्त्याचा प्रवेश करून घेऊ शकतो का, याचा विचार करा. ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’, हा कार्यक्रम मोदींनी दिला आहे. तो घराघरांपर्यंत पोहोचवा. 13 ऑगस्टला तिरंगा फडकवायचा आहे आणि 15 ऑगस्टला सायंकाळपूर्वी उतरवायचा आहे. झेंडा चुकीच्या पद्धतीने लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
अन्याय होणार नाही
निवडणुकीच्या कालावधीत आपला पक्ष मजबूत व्हावा म्हणून मी लोकांना भेटतो आहे. जेव्हा भाजपमध्ये लोक नव्याने जोडले जातील, त्यात तुमच्यावर अन्याय होणार नाही, ही जबाबदारी माझ्यावर आहे. पक्षाची इमारत तुमच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आहे. हा पक्ष कायम पुढे जाईल, यासाठी आपण योजना तयार करत आहोत. त्यासाठी सर्वांनी सज्ज असले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.