महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल मतदारांचे मानले आभार 

Assembly Election : सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

Festival Of Democracy : ‘मता मतांच्या गलबल्यात ही, पडली निवडणूक पार. निर्भिड मतदानाने आपुल्या, झाली निवडणूक साकार. लोकशाहीचे रक्षण करण्या, मतदान महत्त्वाचे. म्हणून मानतो अपुले आम्ही, खूप खूप आभार’ अशा शब्दात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य बाजावताना दाखविलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘निकालाची चिंता न करता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आजपर्यंत निवडणूक लढविली. नेहमीप्रमाणे यंदाही विकासाचा संकल्प घेऊन जनतेशी संवाद साधला. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. अस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो. संवेदनशील जनतेने प्रचारादरम्यान मला भरभरून आशीर्वाद दिले. आज मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्‍या. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्‍या या उत्‍सवात उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही चंद्रपूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

जनसेवा कायम राहणार

निवडणुकीतील विजय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन भाजपाने कायम जनतेनी सेवा केली आहे व यापुढेही ही जनसेवा आम्‍ही निरंतर करत राहू. भाजपा-महायुतीच्‍या माध्‍यमातून हा सेवायज्ञ आम्ही असाच पुढे नेणार आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी (20 नोव्हेंबर) सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 64.48 टक्के मतदानाची रात्री आठ वाजेपर्यंत नोंद होती. संपूर्ण राज्यातील मतदानाची टक्केवारी 58.39 टक्के होती.

Sudhir Mungantiwar : सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बल्लापूर विधानसभा मतदारसंघात 63.44 टक्के मतदान झालं. ब्रह्मपुरी मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 72.97 टक्के होती. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात रात्री आठपर्यंतची टक्केवारी 53.57 टक्के होती. चिमूर विधानसभा मतदारसंघात 74.82 टक्के मतदान झालं. राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 65.59 टक्के असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. वरोरा विधानसभा मतदारसंघात 60.21 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. निवडणूक विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसून येतं. निवडणूक नावाचा लोकशाहीचा उत्सव चंद्रपुरात साजरा करताना नवमतदारांमध्ये जोश दिसत होता. नवमतदारांचे पहिलंच मतदान असल्यानं जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर तरूणाईची गर्दी बऱ्यापैकी दिसली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!