Thank’s Of Forest Minister To Prime Minister : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्याने बल्लारपूर-चंद्रपुरातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला दिलेल्या या अनोख्या भेटीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, 16 सप्टेंबर 2024 रोजी हिरवी झेंडी दाखवत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचे लोकार्पण केले. या एक्स्प्रेससाठी सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वाधिक पाठपुरावा केला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना मुनगंटीवार प्रत्यक्ष भेटले. वंदे भारत सेवा सुरू करण्यासाठी सर्व अचडणी दूर व्हाव्या, यासाठी मुनगंटीवार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आले. वंदे भारत एक्स्प्रेस 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चंद्रपूर येथून सायंकाळी 06.35 वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 07.00 वाजता धावली.
अविरत प्रयत्न
मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबादकरिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. तेव्हापासून ही सेवा सुरू व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी प्रदान केली. या सेवेमुळे नागपूर ते (सिकंदराबाद) हैदराबाद असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
नागपूर ते हैदराबाद प्रवास करणाऱ्या नागरिकांना नवी सेवा देतानाच मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी वर्गाचेही हित जपले. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात दोन थांबे मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे लावून धरली. त्याचाच परिणाम म्हणून अतिजलद असलेल्या या अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुंडम, काजीपेठ आणि त्यानंतर शेवटी सिकंदराबाद असे मोजकेच थांबे या गाडीला आहेत.
Sudhir Mungantiwar : सत्तेच्या सारीपाटावरील सर्वोच्च खुर्चीही बल्लारपूरच्या लाकडाचीच !
वर्ध्याचेही हित
सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर सोबतच वर्धा जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत. सेवाग्रामवर मुनगंटीवार यांचे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला मुनगंटीवार यांच्याच अथक प्रयत्नांमुळे सेवाग्राम येथेही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासोबत मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्यालाही दक्षिण भारताशी आणखी वेगाने जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.