Assembly Election : महाविकास आघाडीचे सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांच्या हाती सत्ता आली होती. पण फक्त केंद्र सरकारवर बोटं उचलण्याचच काम त्यांनी केलं. कोणतेही काम केले नाही. विकास झाला नाही. महाविकास आघाडी म्हणजे कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी आहेत. महाविकास आघाडीकडे सत्ता असताना ते सर्वच पातळीवर नापास झाले, अशी खरमरित टीका वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विनाशवृत्तीवर विकासवृत्तीचा विजय
मुनगंटीवार म्हणाले, ‘विजयादशमीचा उत्सव आटोपला आहे. पक्ष कामाला लागला आहे. दुर्जनशक्तीवर सज्जन शक्तीचा विजय प्राप्त करण्यासाठी काम सुरू झाले आहे. विनाशवृत्तीवर विकासवृत्तीचा विजय झालाच पाहिजे. यासाठी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या सभा होत आहेत. राज्यातील जनतेच्या सेवेसाठी, या मातीसाठी आणि फक्त लोकांसाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातही याच भावना आहेत.’
महायुती सरकार प्रत्येक जागा शिंकण्यासाठी शक्तीने लढेल. कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय लवकरच येईल. तिन्ही पक्ष निवडून येण्यासाठीच जोर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर एकमत होत नाही. त्यांच्यात प्रचंड भांडणं सुरू आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी त्यांच्याकडे कारणं नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. ऐतिहासिक हॅट्रिक साधली. सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने केलेल्या विकासकामांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत भाजपला विजय मिळवून दिला, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
अमित शाह यांचे सुक्ष्म नियोजन
अमित शाह सुक्ष्म नियोजन करतात. एकीकडे एक्झिट पोल्सने काँग्रेस विजयी होणार असे सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांनाही विश्वास बसायला लागला. हरियाणामधील जनता काँग्रेस पक्षाला कौल देणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो अंदाज सपशेल फोल ठरला. अमित शाह यांनी विजयाचे भाकीत केले होते आणि ते खरे ठरले. अमित शाह यांनी विरोधकांना तोंडाच्या भारावर पाडले, असे मुनगंटीवार म्हणाले.
महाविकास आघाडीने मराठीचा अपमान केला
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा सर्वात मोठा निर्णय समजला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी साहित्यिक व इतरांनी खूप मेहनत घेतली. पूर्वीपासूनच याची मागणी राजकीय नेत्यांकडून देखील लावून धरण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय मराठी माणसासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. महाविकास आघाडीने मराठीचा अवमान केला. अफजल खानाच्या कबरीचे समर्थन करणाऱ्या महाविकास आघाडीविरुद्ध शिवभक्तांची ही खरी लढाई आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.