Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, याबाबत राज्यभर चर्चा सुरू आहे. दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण मुख्यमंत्री कोण, हा तिढा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच सुटला, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कारण नसताना विरोधीपक्षाकडून गैरसमज पसरवले जात आहेत. याची स्पष्टता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केली. त्यामुळे तिढा हा शब्दच आता महायुतीच्या डिक्शनरीध्ये दूरदूरपर्यंत नाही, असे ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्पष्ट बहुमत येऊनही सरकार स्थापन व्हायला उशीर लागत आहे, हा विरोधकांचा आरोप धादांत खोटा आहे. विरोधकांना विस्मरण होते आहे. कारण गेल्या 20 वर्षांत सर्वात कमी कालावधीत होणारा शपथविधी आमच्या सरकारचा होणार आहे. 2004 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले होते. तेव्हा 15 दिवस शपथविधीला लागले होते. 2009मध्ये 14 दिवस लागले होते. 2014मध्ये आम्हाला 11 दिवस लागले होते. आताही सर्वात कमी कालावधी सत्ता स्थापनेला लागणार आहे.
काँग्रेसचे निर्णय तथ्थ्यहीन म्हणायचे का?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. याबाबत विचारले असता, 2004मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांनी संपूर्ण लोकसभा निवडणूक ईव्हीएमवर घेण्याचा निर्णय घेतला. मग काँग्रेसवाले जे निर्णय घेतात, ते तथ्थ्यहिन असतात असं म्हणायचं आहे का? काँग्रेस अभ्यास न करता कॅबिनेटमध्ये विषयांना मंजुरी देतात, असं आपण म्हणायचं का? काँग्रेसची दया येते, सहानुभूती वाटते आणि आपल्या देशातील लोकांनी इतकी वर्ष अशा लोकांना का निवडून दिलं, असा प्रश्न पडतो. इतकी वर्ष त्यांना निवडून दिलं नसतं तर आपला देश आज जगात दुसऱ्या क्रमांकावर असता, असं मुनगंटीवार म्हणाले.
सत्ता, खुर्चीपलिकडे त्यांचे जगच नाही
इंडिया आघाडी ईव्हीएमच्या विरोधात मोठी लढाई उभारण्याच्या तयारीत आहे. याबाबत मुनगंटीवार म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करायचे नाही आणि ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करायचे. म्हणजे काय तर ‘आम्हाला पाहा अन् मते वाहा’. सत्ता आणि खुर्ची यापलिकडे त्यांचे जगच नाहीये. 2014 पर्यंत साडेसहा कोटी कुटुंब असे होते की त्यांना साधा निवारा नव्हता. त्याच्यावर ते लोक का बोलत नाहीत. त्यांच्या काळात एकच एम्स होतं. आता 22 झाले आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. हे 22 एम्सचे 50 झाले पाहिजे, यावर ते बोलत नाहीत आणि ईव्हीएमच्या विरोधात लढाई उभी करतात, हे केवळ आणि केवळ हास्यास्पद आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
Congress : ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना मुनगंटीवारांनी धू धू धुतले..!
काँग्रेसनेच काढलेल्या ईव्हीएम मशीनची श्वेतपत्रिका काढली, तर त्यांचा खरा चेहरा पुढे येईल. ईव्हीएमवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने केव्हाच गमावला आहे. ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशात त्यांच्या हातात असलेल्या सर्व राज्यांतील काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले पाहिजे. तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे, असे समजता येईल. काँग्रेसचा निर्णय वाईट नाही, तर त्यांची नियत वाईट आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.