Mahakaryakarta Melava : गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. त्यामुळे भाजपचे पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांवर आहे. केवळ कार्यकर्त्यांनीच पक्षासाठी सगळा त्याग करावा असे नाही. भविष्यात अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी परिवार म्हणून उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्सवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपुरातील दादाजी देशकर सभागृहात आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.
पक्ष हा परिवार आहे. त्यामुळे परिवारात सुख, दु:ख सुरू राहते. राजीनाराजी कायम राहते. परंतु कोणी नाराज असले म्हणून आपल्या आईवडिलांच्या नावाने जाहीरपणे टीका करीत नाही. त्यामुळे प्रत्येकाने हे भान ठेवावे. पक्षात काम करताना काही कार्यकर्ते नाराज होतात. त्यामुळे चंद्रपुरातील प्रत्येकाची नाराजी ऐकली जाणार आहे. ही नाराजी केवळ ऐकलीच जाणार नाही, तर त्यावर उपायही करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत निकाल भाजपने स्वीकार केला. मात्र या नुकसानाची आता व्याजासह भरपाई करायची आहे. त्यामुळे चंद्रपुरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून ही कमतरता भरून काढुया असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
सर्वांपर्यंत सत्य पोहोचवा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विशेषत: काँग्रेसने लोकांमध्ये असत्य पसरविले. लोकांची दिशाभूल केली. आता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या घरापर्यंत पोहचून सत्य पोहोचवावे. महायुतीच्या सरकारने, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांबद्दलही काँग्रेस भ्रम पसरवित आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे ते म्हणाले. आपण निवडणूक हरलो आहोत. हिंमत हरलेलो नाही. आपण लोकसेवेचे व्रत आपण घेतले आहे. आपल्याला हे व्रत पुढे न्यायचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
जे लोक समाजासाठी जगतात त्यांच स्थान लोकांच्या मनात असते. हे स्थान कायमस्वरूपी असते. भाजपला हे स्थान मिळवायचे आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस जातीधर्मांमध्ये द्वेष पसरवित आहे. काँग्रेसमध्ये अशी वाळवी आहे जी देशाला खाऊन टाकेल. त्यामुळे काँग्रेस (Congress) जे विष समाजात पेरण्याचे काम करीत आहे, त्यावर भाजप नावाचेची लस काम करू शकते. भाजपसाठी राष्ट्र प्रथम आहे. पण काही लोक देशविदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. असे राष्ट्रद्रोही लोक हवे की राष्ट्प्रेमी हे सर्वांनी ठरवावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.