महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Crop Insurance : पिक विम्यासंदर्भात मुंबईत तातडीची बैठक 

Support To Farmers : अर्थसंकल्पात राज्य सरकारने पिकविमा योजनेसाठी तरतूद केली आहे. त्यानंतरही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे नमूद करीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चंद्रपुरातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने मुंबईत कृषिमंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

सोमवारी (ता. 5) मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतला. नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश आढाव, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, ब्रीजभूषण पाझारे आदी योवळी उपस्थित होते.

व्यक्त केला संताप

चंद्रपूर जिल्ह्यात पीक विम्यापोटी एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयाचे दावे आहेत. 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचे हे दावे आहेत. त्यापैकी 86 हजार 657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. 10 ऑगस्टपर्यंत 63 कोटी रुपये जवळपास 30 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाच्यावतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येईल. त्याचा लाभ जवळपास 32 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये 13 हजार 462 शेतकऱ्यांनी आणि काढणी पश्चात 21 हजार 795 शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही सर्वेक्षण करण्यात आले नाही. यावर मंत्रिमंडळ बैठकीत बोलणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

पिक विमा योजनेसाठी चंद्रपुरात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र या कंपनीसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. कंपनीची कार्यप्रणाली बेजबाबदार आहे. त्यामुळे या कंपनीला बडतर्फ करण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात येईल. उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्वेक्षणाची प्रत शेतकऱ्यांना देतात. ओरिएंटल इन्शुरन्स शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही. ही बाब गंभीर आहे. विम्यासाठी तालुक्याचे पर्जन्यमान गृहित धरण्याबाबत सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पिकविमा मिळालाच पाहिजे, त्यासाठी कंपनीने तत्काळ सर्वेक्षण करावे, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एकाच गावात विम्याची रक्कम देताना भेदभाव होत आहे. पर्जन्यमान झाले नाही, असा शेरा मारला जातो. पीक विम्याबाबत कंपनीला कोणतेही गांभीर्य नाही. नुकसान झाल्यावर 72 तासात शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगण्यात येते. मात्र अधिकारी सर्वेक्षणाला जात नाहीत. अशा सर्व तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येणार आहे. कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल,असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 7 ऑगस्टला मुंबईत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. त्यात ओरिएंटल कंपनीचे अधिकार उपस्थित राहतील. कृषी सचिव व्ही. राधा यांच्यासोबत चंद्रपुरात 10 ऑगस्टला बैठक होणार आहे. त्यावेळी यावर चर्चा करू अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!