BJP News : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळामध्ये देशाच्या कोणत्याही भागाचा विकास केला नाही. खरंतर वर्धा हे काँग्रेसचे ऊर्जास्रोत असायला हवे होते. त्यातून काँग्रेसला या जिल्ह्याचा विकास करता आला असता. परंतु इतरांना ऊर्जा देणाऱ्या वर्धेचेही काँग्रेसने हाल केले, अशी टीका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आंजी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. महात्मा गांधी यांचे वास्तव्य वर्धेमध्ये होते. काँग्रेस सातत्याने महात्मा गांधींच्या नावावर राजकारण करत आले. परंतु त्याच महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धेचा विकास मात्र काँग्रेसला करता आला नाही. पालकमंत्री झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील अनेक समस्यांचे निराकरण आपण केले, असे मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतरच सेवाग्राम विकास आराखडा मंजूर झाला. आपण स्वतः या आराखड्याला कोट्यवधीचा निधी मंजूर केला, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
बारामतीकरांचा अन्याय..
आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर प्रहार केला. आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून बारामतीकर विदर्भावर अन्याय करीत आले आहेत, हे दिसायचे. त्यामुळे आपण विदर्भातील जिल्ह्यांचा अधिकाधिक विकास व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अर्थमंत्री असताना आपण वर्धा जिल्ह्यासाठी भरीव निधी दिला आहे. आजही पालकमंत्री या नात्याने वर्धा जिल्ह्यासाठी काम करीत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : नवीन संसद भवन आणि चंद्रपूरचे नाते, शुभसंकेत
वर्ध्यासाठी दीडशे कोटी..
वर्धा जिल्ह्यासाठी आपण 150 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हिंगणघाटसाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 25 कोटी रुपयांचा निधी आर्वीला देणारे आपणच होतो. आष्टीकरांनाही पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले. मात्र काँग्रेसने कोणतीही कामे केली नाही. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने काँग्रेसने वर्धा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथी मारली आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नव्हता, असे मुनमंटीवार यांनी स्पष्ट केले.
जळत्या घरापासून सावध राहा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला जळते घर म्हटले होते. जो या घरात जाईल, तो जळून खाक होईल, असा इशारा आंबेडकरांनी दिला होता. त्यामुळे काँग्रेसने बाबासाहेबांना दिलेली वागणूक लक्षात ठेवा. अनुसूचित जातीमधील नागरिकांनी काँग्रेसला आता धडा शिकवावा, असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले.