Chandrapur Constituency : निवडणूक आली की जातीच्या राजकारणाला ऊत येतो. सद्यःस्थितीत यावरून सोशल मिडियावर काही पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. तेव्हा एका जातीच्या भरवशावर उमेदवार निवडून येऊ लागले. तर साहजिकच ते त्या जातीच्या लोकांचीच कामे करतील. तर मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, असा सवाल राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा भाजपचे लोकसभा उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांनी केला. जाती-पातीच्या राजकारणावर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रहार केला.
मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. 26) चंद्रपुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी आयोजित सभेतून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. आशिष देशमुख, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, हंसराज अहीर, आमदार अशोक उईके, राखी कंचर्लावर आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य नंतर आजवर एकाही अर्थमंत्र्याला ते शक्य न झालेले 11 हजार 975 कोटी रुपयांचे ‘सरप्लस रेव्हेन्यू बजेट’ आपण महाराष्ट्राला दिल्याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी यावेळी आवर्जुन केला.
विकास कामांकडे बघा
आपण केलेल्या कामांची चारवेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि दोनदा गिनेज बुक मध्ये रेकॉर्डमध्ये नोंद आहे. विकासाची आतापर्यंत केलेली कामे मतदार पाहणार की काही लोकांच्या आमिषाला बळी पडत केवळ जात पाहणार असेही ते म्हणाले. जातीवर आणि सहानुभूतीवर कुठलीही निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. सहानुभूती एखाद्या व्यक्तीबद्दल नव्हे तर त्याने केलेल्या कार्याबद्दल असायला हवी. एका जातीचा मुद्दा रेटून कुणी राजकारण करत असेल तर मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो, असे ते म्हणाले. जाती-पातीचे असे राजकारण फार काळ टिकत नाही. आपल्यासोबत सर्व जाती-धर्मांचे लोक आहेत. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणुकती विजय झाला तर मतदारसंघाच्या विकासाची उंची मात्र नक्कीच वाढणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.