A Word Of Development : चंद्रपूर जिल्ह्यासह पोंभूर्णाच्या विकासासाठी आपण सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. आपण केलेल्या प्रत्येक विकासाच्या कामाचा पुरावा आहे. चंद्रपूर आणि पोंभूर्णाचा कायापालट व्हावा, हे आपले स्वप्न आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार आल्यास चंद्रपूरच्या विकासासोबत पोंभूर्णासाठी काम करणार, यासंदर्भातील शब्दच वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला आहे.
चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात मंगळवारी (ता. एक) आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात मुनगंटीवार यांनी चंद्रपूर आणि पोंभूर्णाच्या भविष्यातील विकासासाठी काय करणार, हे स्पष्ट व जाहीरपणे सांगितले.
मुनगंटीवार म्हणाले की, बाळसाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरत आहे. हाच समृद्धी महामार्ग आता पोंभूर्णापर्यंत येणार आहे. त्यामुळे पोंभूर्णा येथे राज्याच्या राजधानीशी जोडला जाणार आहे.
शेतकऱ्यांना वचन
राज्यात महायुतीचे सरकार आल्यास समृद्धी महामार्गाच्या कामाला आपण वेग देऊ. या महामार्गामुळे पोंभूर्णा तालुक्याचा कायापालटच होईल. महामार्गाचे काम होत असताना एकाही शेतकऱ्याच्या एक सेंटीमीटर जमिनीचेही नुकसान होणार नाही, असा शब्द मुनगंटीवार यांनी दिला. अलीकडेच आपली राज्याच्या उद्योग मंत्र्यांशी चर्चा झाली.
पोंभूर्णा येथे सुसज्ज औद्योगिक वसाहत (MIDC) करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पोंभूर्णात ही एमआयडीसी नक्कीच उभी राहिल. पाच हजार एकर जागेवर ही एमआयडीसी उभारण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी जाहीर केले.
Forest Minister : आदिवासी कुटुंबांसाठी वनमंत्र्यांकडून आनंदवार्ता
पोंभूर्णा येथील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग यावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या एमआयडीसीमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व्हावी असा प्रयत्न राहणार आहे. आजपर्यंत आपण जो शब्द जनतेला दिला, तो पूर्ण केला आहे. त्यामुळे ‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठीच सुधीर मुनगंटीवार हे नाव ओळखले जाते. त्यामुळे पोंभूर्णातील एमआयडीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.
चंद्रपुरातील तरुणाईला रोजगाराच्या (Employment) शोधात आपले गाव सोडण्याची वेळ येणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. विकासाची कामे करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर आहोत. परंतु ही विकासाची कामे सुरूच राहावी, यासाठी जनतेचीही साथ गरजेची असते. त्यामुळे जनतेने आपल्या साथ देत राहावी, असा अप्रत्यक्ष संदेशच सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांना दिला.