Mazi Ladki Bahin Yojana : महायुतीच्या सरकारकडून जनतेच्या हिताची कामे केली जात आहेत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेबाबत अफवा उठविण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतले आहे, असे सांगण्यात येत आहे. कोणत्याही योजनेबाबत अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. कुठलीही फाईल वित्त विभागाकडूनच येते. राज्यात सुमारे 18 लाख कर्मचाऱ्यांचा वेतनाचा भार सरकारवर किंवा सरकारी तिजोरीवर येत नाही. अशात अडीच कोटी बहिणींना लाभ देताना सरकारला अडचण येण्याचे कारणच नाही, असे ठाम मत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून गरीब आणि गरजू महिलांना फायदा होणार आहे. त्यामुळे गरीबांविरुद्ध दुष्ट प्रवृत्तीचे लोकच अशा अफवा पसरवित आहेत. सरकारने सुमारे 16 लाख लोकांसाठी आतापर्यंत 44 हजार कोटी रुपये दिले. त्यावेळी कोणाच्याही तोंडातून चकार शब्द निघाला नाही. आता अर्थखात्याचे नाव घेत अपप्रचार केला जात आहे. महिला, माता, भगिनींच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी असा खोटा प्रचार केला जात असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. त्याची रक्कमही मोठी आहे. परंतु अशा कोणत्याच योजनेचा भार सरकारवर येणार नाही. मग लाडकी बहिण योजनेचाच भार कसा येईल, असा प्रश्नही सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
अपप्रचारापासून सावध राहा
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीपूर्वी विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान धोक्यात आहे, अशी भीती लोकांना दाखविली. आताही अशाच प्रकारे खोटे बोलण्यात येत आहे. राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील बहिणींनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यात खोटे नॅरेटीव्ह सेट करण्यासाठी महाविकास आघाडीने 68 लोकांची टीम तयार केली आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणतीही योजना जाहीर करण्यापूर्वी सरकारला परिस्थितीची माहिती असते. खर्चाचा ताळमेळ बसवूनच कोणतीही योजना जाहीर केली जाते, असेही मुनगंटीवार म्हणाले.
Ladki Bahin Yojana : अर्थखात्याचा प्रश्न; 46 हजार कोटी कसे आणणार?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या प्रा. मानव यांची चौकशी झाली पाहिजे. प्रा. मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करायला हवे. उगाच आरोप करण्यात काही अर्थ नसतो. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष द्यावे. गरज भासल्यास प्रा. मानव यांची नार्को टेस्टही व्हायला हवी, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.
प्रा. मानव यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध आरोप करताना काही मुद्दे मांडले. सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कारवाईपासून वाचण्यासाठी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव होता. देशमुखांना ऑफर देण्यात आली. त्यानुसार उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे, अनिल परब यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा अरोप प्रा. मानव यांनी केला. देशमुख यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांना 13 महिने तुरुंगात ठेवण्यात आल्याचेही प्रा. मानव म्हणाले. प्रा. मानव यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.