महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : राज्य देशात अव्वल बनेल

Maharashtra Government : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर

Cultural Policy : नवे सांस्कृतिक धोरण महाराष्ट्राला देशात अव्वल बनविणारे ठरेल. नव्याने तयार करण्यात आलेले धोरण इतके सर्वंकष व व्यापक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) होते. 

नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरता एक समिती गठित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच ही समिती जाहीर करणार आहेत. सांस्कृतिक धोरणाच्या शिफारशी केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला हवी असा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आग्रह आहे.

यापूर्वी राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये जाहीर करण्यात आले होते. राज्याचे सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे होते. या समितीने विविध उपसमित्यांच्या मदतीने तयार केलेले नवीन विस्तृत व सर्वंकष सांस्कृतिक धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले.

लवकरच अंमलबजावणी

मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानंतर त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार हे नवीन सांस्कृतिक धोरण लगेचच अंमलात आले आहे. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारसा यांचे संवर्धन करणे, नवीन पिढीला या वारशाची माहिती करून देणे असे अनेक उद्देश संस्कृतिक धोरणात आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिकस्तरावर ओळख मिळवून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देण्यात येणार आहे. या दृष्टीने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले आहे.

या धोरणविषयक शिफारशी सुचविताना सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने कारागिरी, भाषा साहित्य ग्रंथव्यवहार व वाचन संस्कृती, दृष्यकला, गड किल्ले पुरातत्त्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट, भक्ती संस्कृती अशा दहा उपसमित्यांच्या माध्यमातून अभ्यास केला. ही दहा क्षेत्रे सोडून इतरही संकीर्ण विषयांवर समितीने चर्चा केली. त्यात आर्टीफिशीयल इंटलिजन्समुळे ( AI) कला क्षेत्रात येऊ घातलेले बदल आणि त्यांमुळे लोकजीवनाच्या सांस्कृतिक अंगांवर होणारे परिणाम असाही एक विषय चर्चिला गेला.

खाद्य संस्कृती, वस्त्र प्रावरण संस्कृती असेही अनेक विषय चर्चिले गेले. त्याचबरोबर कला जगताकडून व जनतेकडून आलेल्या विविध सूचना, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या सूचना, कलाजगतात कार्यरत असलेल्या विविध संस्था व संघटनांच्या सूचना, प्रशासकीय सूचना अशा सर्व सूचना विचारात घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे धोरण व्यापक आणि सर्वंकष बनले आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीवर कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, ज्येष्ठ लेखक पद्मश्री नामदेव कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, जेष्ठ लेखक आणि समाजसेवक बाबा नंदनपवार, संगीतकार कौशल इनामदार, निर्माता पुरुषोत्तम लेले, ज्येष्ठ लेखक व समाजसेवक दीपक करंजीकर, जेष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ज्येष्ठ आदीवासी कलाकार जगन्नाथ हिलीम, ज्येष्ठ आदीवासी कलाकार सोनूदादा म्हसे, ज्येष्ठ नृत्यांगना विदुषी संध्या पुरेचा यांनी काम केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!