BJP Meeting : सतत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविम्या रकमेसाठी अडवणूक होत होती. आपण यासंदर्भात शब्द दिला होता. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आपण सांगितले होते. दिलेल्या शब्दानुसार आता 31 ऑगस्टपर्यंत चंद्रपुरातील एकूण एक शेतकऱ्याचा विमा दावा निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सभागृहात भाजपचे मंडळ संमेलन पार पडले. या संमेलनाला मुनगंटीवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, मंत्रालयात यासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, शेतकऱ्यांवरील अन्याय आपण खपवून घेणार नाही. यासंदर्भात आपण 5 ऑगस्टला चंद्रपुरात कृषी व विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीतच आपण शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळेल अशी ग्वाही दिली होती. हा शब्द आपण पूर्ण केला आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
जातीचे नव्हे विकासाचे राजकारण
भाजपने कधीच जातीचे राजकारण केले नाही. भाजपने केवळ विकासाचे राजकारण केले आहे. विकास करताना पक्षाकडून कधीही भेदभाव केला जात नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या बळामुळेच भाजप आता सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार अनेक कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबवित आहे. मात्र काही विरोधक लोकांमध्ये भ्रम पसरवित आहे. हा भ्रम दूर करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथनिहाय पुर्नपक्षबांधणी करावी असे आावाहनही मुनगंटीवार यांनी केले.
महिला, शेतकरी, तरुणाईसाठी महायुती सरकारने योजना आणली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आहे. त्यामुळे गावनिहाय, घरनिहाय प्रत्येक लाभार्थ्याकडे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देणे गरजेचे आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचे कार्य जीव ओतून करत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार राहणे गरजेचे आहे. विरोधकांचे सरकार आले तर महायुतीने सुरू केलेल्या योजना ते बंद करतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वांना जनहितार्थ झटावे लागेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
क्रांती घडवा
नऊ ऑगस्टला क्रांती दिन साजरा होतो. याच दिवशी ब्रिटिशांना ‘चले जाव’ ही चळवळ झाली. 1942 मध्ये चंद्रपुरातील चिमुर सर्वांत आधी स्वतंत्र झाले. बर्लिनच्या रेडिओवरून त्याची घोषणा झाली. इंग्रजांची अन्यायकारक सत्ता चंद्रपूरने उलथवून टाकली. अनेक वर्ष राज्य करणाऱ्या परकीयांची सत्ता आणि इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरविण्याची ताकद असलेले चंद्रपूर विकासाच्या वाटेवरही क्रांती घडवू शकतो, यात दुमतच नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.