BJP News : महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा मतदारसंघाचा कायापालट करण्याची काँग्रेसची नैतिक जबाबदारी होती. परंतु या जबाबदारीकडे पाठ फिरविणाऱ्या काँग्रेस आता देशातून विसर्जित करण्याची वेळ आली आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा वर्धाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आर्वीत आयोजित सभेत ते बोलत होते. खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, सुमित वानखेडे, वीरेंद्र कुकरेजा, संदीप काळे, विजय वाजपेयी आदी यावेळी उपस्थित होते.
गांधी चौकात झालेल्या या सभेतून सुधीर मुनगंटीवार यांनी गांधीजी यांच्या वर्धा जिल्ह्याची काँग्रेसने कशी वाताहात केली याचा पुरावा मतदारांपुढे सादर केला. क्रीडा मैदानावरील कुस्तीत विदर्भाच्या मातीतून रामदास तडस हे विदर्भ केसरी झालेले आहेत. राजकीय कुस्तीतही त्यांनी विजय मिळवित विकास केसरी व्हावे, अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांपासून वेगळे नाहीत. काँग्रेसचीच फांदी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. विदर्भाचे सर्वाधिक नुकसान शरद पवार यांनी केले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तर त्यांनी विदर्भ पोखरून टाकला. कापूस विदर्भाचा असायचा परंतु सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात होत्या, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar Slams Sharad Pawar for Injustice on Vidarbha)
विदर्भात सर्वकाही
विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती होते. मात्र लोडशेडिंग याच प्रदेशाच्या माथ्यावर मारले जायचे. एक रुपयाचे नाणे जर रस्त्यावरून सोडला तर थेट पुण्यावरून बारामतीला जाईल, असे रस्ते होते. विदर्भात मात्र खड्डे होते. हा अन्याय करण्यात शरद पवार सर्वांत अग्रसर होते. दांडेकर समितीने विदर्भावर अन्याय झाल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केले. परंतु शरद पवारांनी दहा वर्ष विदर्भासाठी वैधानिक विकास मंडळ होऊच दिले नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने वर्षानुवर्ष हौऊच दिला नाही, त्या पवारांच्या पक्षाला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Lok Sabha Election : पुसदच्या सभेत नितीन गडकरी यांना भोवळ पण..
सोमवार ते रविवार आहे सुधीर मुनगंटीवार
राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धा मतदारसंघात विजय मिळाला तर शरद पवार बारामतीहून वर्धेत विकास करायला येतील का? असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले की, पवार तर येणार नाही पण हाका मारा सोमवार ते रविवार पूर्ण वेळा हा सुधीर मुनगंटीवार उपस्थित असेल. शेजारच्या जिल्ह्यात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसही आहेत. पालकमंत्री म्हणून आपण वर्धा जिल्ह्यासाठी भरभरून विकास निधी दिला आहे. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, वर्धा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी देशासाठी महत्वाचे
नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार चारसौ पार’चे स्वप्न पाहिले आहे. अशात रामदास तडस यांना मिळणारे प्रत्येक मत मोदी यांचे हात बळकट करेल. नरेंद्र मोदी हे देशासाठी महत्वाचे आहेत. रामदास तडस तिसऱ्यांदा विजयी झाले तर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे वजन मात्र निच्छित केंद्रात वाढणार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. वर्धा लोकसभा मतदारसंघाचा जो विकास होत आहे, तो यामुळेच होत आहे, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.