महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : पक्षाला विरोध करणे म्हणजे आपलेच हात कापणे

Chandrapur BJP : सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Mahakaryakarta Melava : कोणताही पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर मोठा होतो. परंतु बरेचदा व्यक्तीगत हेव्यादाव्यातून, गैरसमजातून काही कार्यकर्ते आपल्या मार्गावरून काहीसे ‘साइड ट्रॅक’ होतात. त्यातून विरोधक त्यांना चिथावून देत पक्षविरोधी कार्य करायला भाग पाडतात. कोणत्याही कार्यकर्त्याने असा पक्षविरोध करणे म्हणजे आपलेच हात आपल्याच हाताने कापण्यासारखे आहे. कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा आत्मा असतो. हा आत्माच निघून गेला तर केवळ मृत शरीर शिल्लक राहते. त्यामुळे चंद्रपुरातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपण पक्षाचा आत्मा आहोत, असा अभिमान बाळगावा, असे भावनिक आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

चंद्रपुरातील ऍड.दादाजी देशकर सभागृहात आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकापाठोपाठ महायुती सरकार वेगवेगळ्या जनहिताच्या योजना आणत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली आहे. शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळाली आहे. परंतु काँग्रेस आणि महाविकास आघाडीने या योजना बंद करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या काही लोकांना कोर्टात केस दाखल करायला लावली आहे. असे प्रकार करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

कर्जाची चिंता करू नका

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येताच विरोधकांना सरकारच्या तिजोरीची चिंता वाटत आहे. जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. परंतु औरंगजेबाची बाजू घेणाऱ्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस धडपड करीत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकांशी खोटे बोलण्याचे पाप केले. आता हे खोटे उघडकीस आले आहे. सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीची चिंता महाविकास आघाडीने करू नये, असा सल्लाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे. बहिणींना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. कोणीही ही योजना बंद पाडू शकत नाही. काँग्रेस स्वार्थी पक्ष आहे. भाजप जनसेवा करणारा पक्ष आहे. त्यामुळे जनसेवेचे व्रत घेऊन गावागावात जाण्याचे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. लवकरच तालुकास्तरावर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आपण जाणार आहोत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने आपल्याकडे दुर्लक्ष आहे असे अजिबात समजू नये. हनुमानाला आपल्या ऊर्जा, शक्तीबद्दल माहिती नव्हते. त्यांना त्याचे स्मरण करून देण्यात आले. अगदी त्याच पद्धतीने भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सशक्त आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली शक्ती ओळखत महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!