Cabinet Post : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे नेते, राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आले नाही. सोबतच छगन भुजबळ यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनाही मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले. पण शपथविधी झाला त्या दिवसापासून राज्यात मुनगंटीवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आपण नाराज नाही, हे त्यांनी कालच स्पष्ट केलं. त्यांचे मंत्रिमंडळात नसणे धक्कादायक मानले जात आहे, हे मात्र खरे.
सोमवारी (16 डिसेंबर) दुपारी मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर आज आर्य वैश्य समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आपण नाराज नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ‘मी नाराज नाहीच. पण मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव आहे, हे मला सांगण्यात आलं होतं. 13 तारखेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी मला सागितलं होतं की ‘तुमच्या मंत्रीपदाबाबत शंकाच नाही, तुमचं नाव यादीत आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बोलणं झालं होतं. त्यानंतरही मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव आलं नाही. त्या यादीत माझं नाव कोणत्या पेनने लिहिलं होतं, हे मात्र मला अद्यापही कळलं नाही,’ अशी मिश्किल टीपणी मुनगंटीवार यांनी केली.
संधी
‘मला पक्षाने अनेक वेळा संधी दिली आहे. आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे कुठलंही पद स्थायी नसतं. आज ओहोटी असेल तर उद्या भरतीही येईल. पक्षाकडून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण शक्तीने पार पाडण्याचे काम करत आलो आहे, करत आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. मी देशाप्रती समर्पित कुटुंबाचा सदस्य आहे. जर आणीबाणी लागली नसती तर मी राजकारणातच आलोच नसतो. माझे वडील एमबीबीएस डॉक्टर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आणीबाणी मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर माझा मार्ग बदलला आणि मी राजकारणात आलो,’ याचाही त्यांनी उल्लेख केला.
Sudhir Mungantiwar : पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच
सोनं केलं
‘पक्षाने अनेकदा मला संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जेवढी कामे केली त्याचं कौतुक आज देश करतो आहे. त्यामुळे दुःख करण्यासारखं असं काहीच नाही. माझी पाटी कोरीच आहे. जनतेने आमदार म्हणून निवडून देऊन मला सन्मान दिला असून जनतेची कामे करायची आहेत,’ असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.