‘सामना’मध्ये संजय राऊत यांचे ‘रोखठोक’ प्रकाशित झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पण महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनीही संजय राऊतांना सुनावले. आता महाविकास आघाडीत राहायचे की नाही, असा सवाल ‘हाय कमांड’ला विचारणार असल्याचेही आमदार ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यानंतर लगेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर यांनीही राऊतांचा समाचार घेतला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ दैनिकातील आपल्या रोखठोक सदरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भाष्य केले आहे. त्यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार दरेकर म्हणाले की, 4 जूननंतर संजय राऊत यांचे थोबाड फुटलेले दिसेल. योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितले आहे. मोदी विरूद्ध योगी असे चित्र उभे करू नका. संजय राऊत आपल्या पक्षाची, घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालणार, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ठ झाले आहेत. म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काहीही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करताहेत.
‘सामना’च्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरींच्या बाबतीतले वक्तव्य म्हणजे संजय राऊत यांचा मूर्खपणाचा कळस आहे. प्रचारात राज्यभर व्यस्त असतानाही देवेंद्रजी फडणवीसांनी आणखी विजय भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिले, हे नागपूरवासीयांना चांगलेच माहिती आहे. संजय राऊत यांचे दुटप्पी बोलणे आहे. अगोदर बोलायचे की, विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचे प्रचारात उतरले. संजय राऊत नेमके टीका करतानाही काय बोलायचे, हे निश्चित करून घ्या, असा टोलाही दरेकरांनी लगावला.