Ladki Bahin Scheme : राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. योजना जाहीर झाल्यानंतर लाभार्थी अर्ज भरण्यासाठी महिलांची अनेक कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. यासंदर्भात काँग्रेसने (Congress) अपप्रचार सुरू केल्याची टीका होत आहे. यावर आता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचा संकेत दिला आहे. बल्लारपूर येथे महिला मोर्चाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.
मुनगंटीवार म्हणाले, मध्य प्रदेशात अशी योजना सुरू आहे. परंतु तेथे एक हजार रुपये मानधन मिळत आहे. महाराष्ट्रात मात्र या योजनेतून भगिनींना दीड हजार रुपये मिळणार आहे. केवळ दीड हजार रुपयेच मिळणार, असे खोटेही काँग्रेस सांगत आहे. परंतु एकाच कुटुंबात अनेक पात्र लाभार्थी असतील, तर त्यांनाही अर्ज करता येणार आहे. योजना जाहीर झाल्यानंतर सरकारने भगिनींची होत असलेली धावाधाव लक्षात घेतली. अनेक अटी शिथिल केल्या.
भविष्यातही बदल शक्य
योजना जाहीर झाल्यानंतर काही अटी शिथिल करण्यात आल्या. त्यामुळे शासनाने धोरण रयतेच्या हिताचे आहे. भविष्यात गरज वाटल्यास सरकार आणखी अटी शिथिल करू शकते, असे संकेतही मुनगंटीवार यांनी दिले. लवकर अर्ज करा अन्यथा लाभ मिळणार नाही, असे विरोधक बोलत आहेत. परंतु आपली यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा झाली आहे. अर्ज भरण्याला सरकारने ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
घरात बहिण ही महत्वाची असते. घरातील बहिण कशापासूनही वंचित राहणार नाही, असा प्रत्येक भावाचा प्रयत्न असतो. अशात सरकारसाठी तर सगळ्या भगिनी ‘लाडकी बहिण’ आहेत. त्यामुळे एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रसंगी सरकार मुदवाढीबाबत आणखी निर्णय घेऊ शकते, असा संकेतही त्यांनी दिला. यामागे सरकारचा कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये, हाच प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून चाचपणी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर सरकारकडून अनेक पातळ्यांवरून माहिती मागविली जात आहे. महसूल, पोलिस, महिला व बाल कल्याण अशा अनेक विभागांकडून सध्या शासन ‘फिडबॅक’ घेत आहे. ‘द लोकहित’ला ही माहिती मिळाली आहे. अशा सर्व विभागांकडून जाणाऱ्या ‘फिडबॅक’नंतर राज्य सरकार लाडकी बहिण योजनेतील अटींमध्ये आणखी शिथिलता आणू शकते,अशी माहिती आहे. सध्याच्या योजनेत महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असेल, तर अशा महिलेला पात्र धरले जात नाही. परंतु अनेकदा एकाच कुटुंबातील एका भावाची परिस्थिती सधन आणि दुसऱ्याची निर्धन अशी असते. अशात मोठ्या भावाच्या नावाने चारचाकी वाहनाची नोंदणी असेल पण लहान भावाच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असेल तर त्या कुटुंबातील महिलेवर अन्याय होणार आहे.
अशा अनेक प्रकारचे ‘फिडबॅक’ गोळा करून पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभागाने सरकारला पाठविले आहे. या सर्वांचा विचार करून लवकरच आपली बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या अटीत आाणखी बदल होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. सध्या महिलांची अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे.
सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ अॅपवरही आता घरबसल्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येत आहे. त्यामुळेच कदाचित सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांना गर्दी करू नका, असे आवाहन केले असावे, असे सांगण्यात येत आहे.