Development Of Maharashtra : महाविकास आघाडीच्या हातात आजपर्यंत सत्ता राहिली असती तर महाराष्ट्राची दुर्गती झाली असती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात केस केली. यावरून महाविकास आघाडीला विकासाची किती एलर्जी आहे, याचा अंदाज येतो, अशी बोचरी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सर्व सामान
एका मुलाखतीत मुनगंटीवार यांनी आपली विकासाची संकल्पना मांडली. 30 वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा पुराव्यानिशी जनतेपुढे सादर करीत असल्याचेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात आपण मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केली आहेत. पण कधीही जाती-धर्माचा भेद केला नाही. चंद्रपुरातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रत्येक जाती-धर्माच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहे, असंही ते म्हणाले.
जाती-धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा
येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व जातींच्या रुग्णांवर इलाज होईल. देशातील सर्वोत्कृष्ट सैनिक शाळा येथे सुरू केली. तेथेही समाजातील प्रत्येक वर्गाला स्थान मिळत आहे. विकासाच्या प्रवाहात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण जात, धर्म, पंथापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
राहुल गांधी जात विचारतात
काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकारांनाही जात विचारतात. याच जातीपातीच्या आधारावर इंग्रजांनी भारतात फूट पाडली. हाच वारसा काँग्रेस पुढे नेत आहे. मुळात विकास पाहायचा की जात, असा प्रश्नही सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. काँग्रेस घातक आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. बाबासाहेबांना पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले. काँग्रेसच्या दोन पंतप्रधाना काँग्रेसने स्वतःच भारतरत्न दिले. पण त्यांना बाबासाहेब आंबेडकर दिसले नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.