Felicitation Ceremony : मानवतेची शिकवण देताना कोणत्याही संतांनी कधी जात पाहिली नाही. संत तुकाराम यांचे अभंग काहींनी बुडविले. ते अभंग संत जगनाडे महाराज यांनी बाहेर काढले. हे करताना जगनाडे महाराजांनी जातीपातीचा विचार केला नाही. आपणही राजकारण, समाजकारण करताना असा कोणताही भेद पाळला नाही. पाळणार नाही. त्यामुळे मुल येथे सकल कुणबी समाजासाठी सर्व सोयींनी परिपूर्ण असे सभागृह उभारू, असा शब्द राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. मुल येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
गडचिरालीच्या गोंडवाना विद्यापीठाने मुनगंटीवार यांना डी. लिट. या पदवीने सन्मानित केले. या सन्मानाबद्दल मूल येथे सकल कुणबी समाजाच्यावतीने मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. मुनगंटीवार मूल येथे आल्यानंतर भव्यदिव्य बाइक रॅलीने त्यांना कन्नमवार सभागृहातील मेळाव्याच्या ठिकाणची आणण्यात आले. यावेळी प्रचंड पुष्पवृष्टीही करण्यात आली. कुणबी समाजाने केलेल्या स्वागतामुळे मुनगंटीवार भारावून गेले होते. याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. जातीभेद न पाळण्याची शिकवण संतांनी दिली. हाच वारसा कुणबी समाज जोपासत असल्याचे ते म्हणाले.
मूलमध्ये परिवर्तन
मूलचा कायापालट झाला आहे. कोणत्याही गावाचा विकास करण्यासाठी अगदी मुळापासून समस्यांचे निराकरण करावे लागते. सीमेंट रस्ते, सौंदर्यीकरण अशी व्यापक कामे आपण मूलमध्ये आपण केली आहेत. तरीही काही लोक मुनगंटीवार यांनी काय केले, असा प्रश्न करतात. असा प्रश्न विचारणाऱ्यांचं हसू येतं. असा प्रश्न करणारे विरोधक लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवितात. आपण केलेले प्रत्येक काम दृष्य आहे. रेकॉर्डवर आहे. प्रत्येक कामाचा पुरावा आहे. आता असेच एक काम मूलमध्ये करायचे आहे. मूलमध्ये संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारायचे आहे. यासाठी जागा, निधी कसा उभारायचा हे ठरवून ठेवले आहे. त्यामुळे हे सभागृह उभे राहिलच, असा शब्दच मुनगंटीवार यांनी दिला.
मुनगंटीवार यांच्यावर एका विद्यार्थ्यांने पी. एचडी. केली. राष्ट्रपतींच्या हस्ते या विद्यार्थ्याला पदवी बहाल करण्यात आली. ज्या व्यक्तीवर पी. एचडी. झाली, त्याच व्यक्तीला गोंडवाना विद्यापीठाकडून डी. लिट मिळाल्याचा योगायोगही त्यांनी सांगितला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार करून घेण्याचे सौभाग्य लाभले. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाची पहिली वीट रचण्यात हातभार देता आला. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नाव मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो. हे सगळं करताना आपण कधीही जात आडवी येऊ दिली नाही, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.