Winter Assembly Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस राज्याचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याने विधिमंडळात येणार नाही अशी चर्चा सुरु असतानाच बुधवारी (18 डिसेंबर) चंद्रपूरच्या या वाघाने विधानभवनामध्ये दमदार एन्ट्री घेतली. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
सुधीर मुनगंटीवार विधान भवनामध्ये येताच परिसरातील अनेकांनी त्यांना गराडा घातला. त्यांच्याभवती प्रसार माध्यमांची गर्दी झाली. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने त्यांच्याभवती जमा झाले. प्रत्येकाला त्यांच्याशीच बोलायचे होते. मुनगंटीवार नाराज आहेत की नाहीत, हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे होते. मात्र या सगळ्यांच्या गर्दीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाच्या डरकाळी प्रमाणे ‘मी नाराज नाही… नाराज असूच शकत नाही’ असं ठामपणे सगळ्यांना सांगितले.
आमदार-पत्रकार मुनगंटीवारांच्या दिशेने
विधान भवनामध्ये कुर्ता पायजमा या साध्या वेशात सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य प्रवेशद्वारातून एन्ट्री घेतली. क्षणाचाही विलंब न करता सगळेजण मुनगंटीवार यांच्या दिशेने धावले. भाजपचे अनेक आमदार आणि नवनियुक्त मंत्री देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या दिशेने सरसावले. जवळपास दीड तास सुधीर मुनगंटीवार यांना एकाच ठिकाणी कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी, आमदार आणि प्रसार माध्यमांचा गराडा होता. सुधीर मुनगंटीवार हे देखील प्रत्येकाशी तितक्याच आत्मीयतेने चर्चा करीत होते. प्रत्येकाच्या प्रश्नाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले.
चर्चांना पूर्णविराम
भारतीय जनता पार्टीमधील सुधीर मुनगंटीवार हे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळात ते राहणार नाही असा विचार कुणीही केला नव्हता. मंत्रीमंडळाच्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेकांना धक्का बसला आहे. नागपुर हिवाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार दोन दिवस उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चांना पेव फुटला होता.
नाम ही काफी है
पहिल्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी आपण विधान भवनामध्ये का आलो नाही, हे स्पष्ट केले होते. हेच कारण त्यांनी बुधवारी विधानभवनात आल्यानंतर देखील सर्वांना सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांना विधान भवनाच्या परिसरामध्ये चाहत्यांनी घातलेला गराडा पाहता भाजपच्या या नेत्याचे ‘नाम ही काफी है’ असा प्रत्यय पुन्हा एकदा आला.