Mumbai : मराठी मालिका, रंगभूमी, मराठी चित्रपट या सर्व क्षेत्रांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे दिग्गज कलावंत म्हणून विजय कदम यांची ओळख होती. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. असा हा हरहुन्नरी कलाकार आपल्यातून हरपला आहे, अशा भावना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ कलावंत विजय कदम यांचे शनिवारी (ता. 10) निधन झाले. त्यांच्या निधनाबद्वर मंत्री मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. विजय कदम यांनी विविधांगी भूमिका मराठी रंगभूमीवर साकारल्या. मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सध्याच्या नव्या कलावंतांसोबत काम करतानाही ज्येष्ठतेचा कुठलाही आव न आणता त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला.
सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘टूरटूर’ या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केलेले टुरटुर नाटकाने रसिकांना मनमुराद हसवले. विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. ‘चष्मेबद्दूर’, ‘मंकी बात’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटकं पाहायला जाणार असो, सहायक कलाकारांना प्रोत्साहन असो, विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावून कलाकारांचं कौतुक करणे असो … त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. आजारपणातून ते बाहेर आले असतानाच आजाराने पुन्हा त्यांना गाठले आणि आपल्यातील एक मनस्वी कलावंत काळाने हिरावला, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी विजय कदम यांना श्रध्दांजली वाहिली.