Savali Indecent : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधीर मुनगंटीवार धावले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांना खिचडीचे वितरण करण्यात आलं होतं. त्यानंतर सुमोर 40 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.
अन्नातून मुलांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे, अशाही सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या शाळेत ही घटना घडली तेथे 126 विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील 106 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संवाद साधला. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी याबबात तातडीनं पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थांना सर्वोत्तम उपचार मिळावे, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, असे निर्देशही मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
Sudhir Mungantiwar: मूलमधील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा
शाळेत माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. अनेकांना रात्रीतून त्रास झाला. त्यामुळं पालकांनी या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शाळेतील स्वयंपाकी महिलांनाही विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. .
गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि शिक्षकांना यासंदर्भात लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकाराची दखल घेतल्यानंतर तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सायंकाळी रुग्णालयात जात विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. उपचार घेत असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सीईओ जॉन्सन आणि सावलीचे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी स्पष्ट केलं. विषबाधेच्या या प्रकरणाची आता सुधीर मुनगंटीवार यांनीही दखल घेतल्यानं दोषी सुटणार नाहीत, असं ठामपणं मानलं जात आहे.