MSEDCL News : विजांच्या तारांची चोरी होण्याचा प्रकार नवा नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपम्पांना वीज जोडणी देण्यासाठी वीज तारांचे जाळे टाकण्यात येते. परंतु चोरटे अशा तारांना पळवितात. आतापर्यंत अशा चोरट्यांविरुद्ध केवळ गुन्हा नोंद होत होता. परंतु चंद्रपुरात यापुढे असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई (Strict Police Action) करण्यात येणार आहे. यासंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वीज तार चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांमुळे महावितरणचे नुकसान होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना वीज पुरवठा करतानाही अनेक अडचणी येत आहत. यासंदर्भातील अनेक तक्रारी मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी पोलिसांना अशा चोरट्यांना कायदेशीर कारवाईचा ‘शॉक’ देण्याचे आदेश दिले आहेत.
मूल तालुक्यात अनेक घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. कृषिपम्प वाहिनीच्या लघुदाब व उच्चदाब वाहिनीचे तार वारंवार चोरी होत आहेत. अशा अनेक घटना घडल्या आहेत.
Maharashtra Council : मुंडेंनाही दिले चंद्रकांतदादांनी चॉकलेट
त्यामुळे विद्युत वाहिनीचे खांबही खाली पडत आहेत. चोरीच्या या घटनांमुळे महावितरण कंपनीचे नुकसान तर होतच आहे, शिवाय शेतकरी सुद्धा कृषिपम्प जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. तार चोरी झाल्यानंतर महावितरणला नवीन वाहिनी पुन्हा पुन्हा उभी करावी लागत आहे. यात वीज जोडणी देताना विलंब होत आहे.
वीज तार नसल्यामुळे कृषिपम्पाला जोडणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाअभावी नुकसान सहन करावे लागत आहे. चोरीच्या या घटनांची मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलिसांना दिले आहे. वीज तार चोरणाऱ्या चोरांना तत्काळ पकडण्यात यावे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी कृषी विभागाची बैठक घेतली होती. कर्ज वाटप, पिकविमा याचा आढावा त्यांनी घेतला होता. बँकांमधील अधिकारी, कर्मचारी रजेवर असल्यास पर्यायी मनुष्यबळ नेमण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. अशातच आता वीज तार चोरणाऱ्यांविरुद्ध फास आवळण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा संकेतच मुनगंटीवार यांनी दिला आहे.