BJP News : पक्षनिष्ठा कशी असावी आणि मनाचा मोठेपणा कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण हे ताराचंद हिकरे आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यासोबत संपर्क करण्याच्या योग आला. त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळावे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वरोरा तालुक्यात असलेल्या माढेळी येथे ताराचंद हिकरे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. हिकरे यांच्या परिवाराची ज्यावेळी आपण सांत्वन भेट घेतली, त्याच वेळी आपण ताराचंद हिकरे यांच्या नावाने सभागृहाच्या उभारणीचा निश्चय केला होता, असे मुनगंटीवार म्हणाले.
ताराचंद हिकरे यांच्यासारखे नेते सोन्यासारखे होते. सोन्याच्या हृदयाचे होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निस्वार्थपणे पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे. ताराचंद हिकरे यांचे नाव मिळाल्याने माढेळीतील सभागृहाची शान वाढणार आहे. त्यातून भविष्यातील पिढ्यांनाही ताराचंद हिकरे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा मिळत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. हिकरे परिवार हा भाजपचा परिवार आहे. त्यामुळे आपल्यासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हिकरे परिवाराच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही देखील मुनगंटीवार यांनी दिली.
निधी अपुरा पडणार नाही
माढेळी येथील सभागृहासह परिसरातील विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही. ताराचंद हिकरे हे भाजपचे परीस होते. त्यामुळे त्यांच्या गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत आणि नागरिक जे काही मागतील ते पुरविण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू, असे मुनगंटीवार म्हणाले. हिकरे हे सेवाभावाने कार्य करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आदर्श आहेत. आपण राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री होतो. त्यामुळे सरकारी तिजोरी उघडते, तो कोडनंबर आपल्याला आजही पाठ आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी ते काही गरजेचे असेल तरे आपण करू, असेही मुनगंटीवार म्हणाले.
माढेळी येथील सभागृहाच्या देखभाल दुरूस्तीसाठी एक समिती नेमण्यात यावी. त्यामुळे सभागृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होणार नाही, असा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.समाजातील गरीबांना अत्यंत माफक दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात यावे. सभागृहाच्या शेजारी मोकळी जागा आहे. तेथे सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात यावे. यासाठी लागणारे सहकार्य आपण करू, असेही मुनगंटीवार म्हणाले. सभागृहातील वाढीव सुविधांसाठीही प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले.