Relief To Farmers : पीकविम्याची रक्कम मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दिल्यानंतर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तो अवघ्या 96 तासात खरा करून दाखविला आहे. दिलेल्या ग्वाहीनुसार मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बैठक घेत चंद्रपुरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला आहे. त्यानुसार एकूण एक शेतकऱ्याला आता पीकविम्याची रक्कम मिळणार आहे.
पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. चंद्रपुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता 31 ऑगस्ट पूर्वी देण्याचे आदेश मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिले आहे. विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपनीबद्दलही मुनगंटीवार यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार मुंडै यांनी अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे कडक निर्देश दिलेत. पिकविमा सर्वेक्षणातील त्रुटींबाबतही त्यांनी चर्चा केली.
वनमंत्र्यांचा संताप
शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने मुनगंटीवार यांनी काही कंपन्यांबद्दल कृषिमंत्री मुंडे यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली. ज्या कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत होती, त्या अधिकाऱ्यांना चंद्रपुरातच मुनगंटीवार यांनी धारेवर धरले होते. कृषिमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. चंद्रपुरातील एकाही शेतकऱ्याची पिळवणूक आपण खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, मुख्य सांख्यकी वैभव तांबे, कृषी आयुक्तालय, नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, ओरिएंटल विमा कंपनीचे मुंबई कार्यालयातील व विभागस्तरवरील अधिकारी आणि चंद्रपुरातील शेतकऱ्याचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.
चंद्रपुरातील 42 हजार 183 ऑनलाइन आणि 18 हजार 820 ऑपलाइन सूचनापत्र दाखल झाले आहेत. एकूण 61 हजार 3 शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात अर्ज केला आहे. 47 हजार 541 शेतकऱ्यांकडे सर्वक्षण करण्यात आले. त्यातून 15 हजार 729 शेतकऱ्यांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली. 25 हजार 434 शेतकऱ्यांचा दावा नाकारण्यात आला. काढणीनंतर 39 हजार 826 ऑनलाइन आणि 9 हजार 492 ऑफलाइन दावे दाखल झालेत. एकूण दाव्यांची संख्या 49 हजार 318 आहे. त्यातील 27 हजार 523 शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षणचे झाले नाही. 21 हजार 795 पैकी 971 शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला. उर्वरित 19 हजार 560 शेतकऱ्यांचा दावा नाकारण्यात आला. हे सर्व दावे मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 208 कोटी 40 लाख 31 हजार रुपयांची रक्कम मंजूर आहे. त्यापैकी 127 कोटी 74 लाख 11 हजार रुपये प्रलंबित आहेत. उर्वरित सर्व रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत देण्याचे आदेशही कृषी मंत्र्यांनी दिले आहे. रकमेपैकी 40 कोटी रुपये ऑनलाइन पोर्टलवर अदा करण्यासाठी अपलोड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नंदू रणदिवे, बंडू गौरकर, शंकर विधाते, विनोद देशमुख, चंदू नामपल्लीवार, देवानंद नारमलवार, विवेक ठिकरे, सचिन गुरनुले आदींच्या उपस्थितीत ही चर्चा झाली.