या लेखात प्रकाशित झालेली मते लेखकांची आहे. द लोकहित त्याच्याशी सहमत असेलच असे नाही
Moment Of Celebration : देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पोहाचला आहे. शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालेत. अशातच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हे औचित्य साधत शिवसेवा करण्यास प्रारंभ केला. अर्थातच याचे श्रेय द्यावे लागेल या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना. मुनगंटीवार यांचा आजपर्यंतचा इतिहासच वेगळा आहे. अगदी मृतप्राय विभाग जरी त्यांच्या हाती दिला, तरी ते त्यात जोश आणि जान फुंकतात. अशी काही विक्रमी कामे करून दाखवितात की अनेकांन प्रश्न पडतो की, या विभागातही काम करण्यासारखे इतके काही आहे?
वनमंत्री पदाचा कार्यभार आल्यानंतर मुनगंटीवार यांनी या शिवप्रेमाची खरी प्रचिती दिली. बऱ्याच वर्षांपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवती अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण 10 नोव्हेंबर 2022 रोजी वन विभागाने हटविले. हा धाडसी निर्णय होता. तो मुनगंटीवार यांनी घेतला. 19 फेब्रुवारी 2023 रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण-ए-खास महालात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याच दिवाण-ए-खास मध्ये महाराजांचा अपमान औरंगजेबाने केला होता. 2023 मध्ये रायगडावर भव्यदिव्य शिवराज्याभिषेकाच्या सोहळा साजरा झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल आणण्यात आले.
नेत्रदीपक यात्रा
शिवराज्याभिषेकासाठी सहस्त्रजलकलश यात्रा राजभवन येथुन सुरू झाली. रायगड येथे या जलाने 2 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा पार पडला. 1 जून 2023 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्य विभागाकडून भरविण्यात आले. शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष लोगो प्रकाशित करण्यात आला. त्याचा वापर राज्य सरकार करीत आहे. आता शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी शासनाकडून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 6 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने शिवकालीन होन या टपाल तिकिटाचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हे सर्व उपक्रम राबविण्यात येत आहे. आता मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास 18 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली आहे. मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी एक शिवविचार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकवण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्या वरील टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर 3 ऑक्टोबर 2023 रोजी मुनगंटीवार यांनी स्वाक्षरी केली.
भारत-पाक सिमेवर पुतळा
जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारातून उभा राहिला. 7 नोव्हेंबर 2023 रोजी हा पुतळा बसविण्यात आला. 12 जानेवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ व बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे टपाल तिकिटाचे अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होत आहेत. 13 जानेवारी 2024 रोजी नागपुरात त्याचा शुभारंभ झाला.
Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतीक्षा संपली
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात 7 मार्च 2024 रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दृष्टीबाधित दिव्यांगजनांसाठी ब्रेल लिपीमधून शिवचरित्र प्रकाशित करण्यात आले.
‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्रात 12 ठिकाणी घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयामागेही सुधीर मुनगंटीवार यांचीच संकल्पना होती.
राज्यशस्त्र झाले दांडपट्टा
शिवकालीन शस्त्र दांडपट्टाला राज्यशास्त्राचा दर्जा देण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणाऱ्या सिंदखेडराजा येथील मूलभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपये देण्यात आलेत. हा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी याच कार्यकाळात घेतला. पन्हाळगड ते विशाळगड या मोहीम मार्गावर निवासाची सोय करण्यासाठी 15 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेत. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे शिवसृष्टी उभारणीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे याच कार्यकाळात मराठा लष्कर स्थापत्यास युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे.
महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री असताना मुनगंटीवार यांनी आंध्र प्रदेशच्या श्रीशैल्यम येथील श्री शिवाजी मेमोरियल कमिटी यांच्या मागणीनुसार श्रीशैल्यम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यानमंदिर बांधण्यासाठी 3 कोटी 38 लाखांची आर्थिक केली. स्वराज्यातील रयतेसाठी कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्प केला होता. असाच संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार एक एक करीत सकारात्मक पावले उचलत आहेत.