Governor Of Maharashtra : पंचायत विस्तार अधिनियम 1996 अंतर्गत (पेसा) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा (हेटी), चेकआष्टा, देवई, भटारी, केमारा, चिंतलधाबा एक, चिंतलधाबा दोन, सातारा तुकुम, सातारा भोसले, खेरगाव ही 10 गावे पेसा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची विनंती आदिवासी समाजाने केली होती. यासंदर्भातील आदिवासी बांधवासमवेत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
मंगळवारी (ता.7) मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी राज्यपालांना निवेदन दिले. संबंधित दहा गावे पेसा म्हणून घोषित करण्याची मागणी तेथील ग्राम पंचायतींनी शासनाकडे केली आहे. या दहा गावांतील अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2011 मधील जनगणनेनुसार 50 टक्यांपेक्षा जास्त आहे. ही गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विकास विभागाला सादर करण्यात आला आहे, याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
सकारात्मक प्रतिसाद
पेसा संदर्भात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात पुढाकार घेण्याबद्दल राज्यपालांनी आश्वस्त केले. त्याबद्दल आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. दिवाळीत राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करताना पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपरिक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही, राज्यपालांनी मुनगंटीवार, जगन येलके आणि उपस्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. आदिवासी समाजाला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. आदिवासी समाजातील तरुण प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्यांच्या प्रगतीला चालना देणे आणि एकूणच आदिवासी समाजाचा विकास करणे कायम अजेंड्यावर राहील, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
विजयाचा दिवस
9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन असतो. हा दिवस विजयाचा दिवस आहे. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आदिवासी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे यंदाचा जागतिक आदिवासी दिन खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि विजयाचा दिवस आहे, अशी भावना जगन येलके यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांची संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी आदिवासी समाजाच्यावतीने आभार मानले. राज्यपालांसोबत आदिवासी समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची व त्यांना निवेदन देण्याची मुनगंटीवार यांच्यामुळे प्राप्त झाल्याबद्दल आदिवासी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली.