महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : 75 नवीन चित्रनाट्यगृहं; निःशुल्क चित्रीकरण!

Cinema Theaters : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बंपर घोषणा

मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दणक्यात कमाई करावी. एक दिवस मराठी चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषेत डबिंग व्हावे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. पण केवळ शुभेच्छा देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले! महाराष्ट्रात 75 चित्रनाट्यगृहं उभारण्याची आणि निःशुल्क चित्रीकरणाची घोषणा त्यांनी केली. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही बंपर घोषणा ठरली. शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे, अशी मुनगंटीवार यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे.

निमित्त होते अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाचे. त्यांच्या हस्ते दर्जेदार मराठी चित्रपटांना 14 कोटी 22 लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण सह्याद्री अतिथीगृहात झाले. यावेळी त्यांनी नरीमन पॉईंट येथे मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृह उभारणार असल्याचे सांगितले. ‘मुंबई, कोल्हापूरप्रमाणे नागपुरात सुद्धा 150 एकरमध्ये फिल्म सिटी तयार होणार आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानगीसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी होईल. राज्यात 75 नवीन चित्रनाट्य गृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथे मराठी चित्रपट गृह उभारण्यात येणार आहे,’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

निर्मात्यांना जिथे चित्रीकरण करायचंय तिथे त्यांना निशुल्क चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहेनत घेतलेली असते. पण कधी यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खचून जायचे नसते. शासन कायम मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. तर जगात भरारी घेणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपला चित्रपट दक्षिणेत बघतील

दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची सुरुवात केली. दादा कोंडके या साध्या माणसाचे सगळे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. तर रजनीकांत या मराठी अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेत सर्वांची मने जिंकली. त्यांचा आदर्श मराठी चित्रपटसृष्टीने समोर ठेवावा. मराठी चित्रपटसृष्टीने अजून प्रगती करावी. जसे दक्षिणात्य भाषेचे चित्रपट हा मराठी मध्ये डबिंग करून दाखवले जातात. तसे भविष्यात मराठी चित्रपट दाक्षिणात्य व अन्य भाषांमध्ये डबिंग करून दाखवला गेले पाहिजेत, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीत अडेलपट्टूपणा

हा फक्त धनादेश नाही

दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे. हा फक्त धनादेश नाही तर महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या या शुभेच्छा आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने सातासमुद्रापार जावे. जागतिक झेप घ्यावी, अशी अपेक्षा आहे. कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक मराठी होते. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ सुद्धा याच महाराष्ट्रात रोवली गेली होती. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या चित्रपटांना दुप्पट अनुदान

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच अ दर्जा प्राप्त महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ‘तिचं शहर होणे’ या चित्रपटासाठी रसिका आगाशे, ‘येरे येरे पावसा’साठी शफक खान, ‘बटरफ्लाय’साठी मीरा वेलणकर, ‘गिरकी’ या चित्रपटासाठी कविता दातीर आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘वाळवी’ चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात 77 अ व ब वर्ग दर्जाच्या व तसेच प्रथमच समावेश केलेल्या क वर्गाच्या 21 चित्रपट निर्मात्यांना 29 कोटी 22 लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!