महाराष्ट्र

Maharashtra Politics : लोकसभेच्या निकालानंतर राजकारणाची हवा बदलली !

Marathwada News: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातील वारे आता उलटे वाहू लागले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मराठवाड्यात धक्क्यावर धक्के बसत आहेत.

माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपमधून बाहेर पडत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भालेराव लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालेरावांच्या रूपाने राष्ट्रवादीला उदगीरमध्ये मोठा चेहरा मिळाला आहे.

भालेराव हे येत्या निवडणुकीत विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार असण्याची शक्यता आहे.लवकरच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपने त्यांना डावलून परभणीतील डॉ.अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी झाले.

संजय बनसोडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. महायुती सरकारमध्ये ते सध्या क्रीडामंत्री आहेत. उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, आता राष्ट्रवादीच्या दोन गटांतच विधानसभा निवडणुकीत सामना होण्याची शक्यता आहे. विधानसभेत संजय बनसोडे अजित पवार गटाकडून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपला अजित पवार गटाला मदत करावी लागणार आहे. परिणामी सुधाकर भालेराव यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

एकेकाळी मराठवाड्यात भाजपचे गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी स्थिती होती. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे सुधाकर भालेराव हैराण होते. त्यामुळे सुधाकार भालेराव गेल्या काही महिन्यांपासून भाजप सोडणार अशा चर्चा होत्या. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती. आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

धक्क्यावर धक्के 

नांदेड जिल्ह्यात यापूर्वी ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डॉ. माधव किन्हाळकर हेदेखील भाजपमधून बाहेर पडले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगळवारी पाठविलेल्या तीन ओळींच्या राजीनामा पत्रात किन्हाळकर यांनी पक्षातील पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!